पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १४ ]

जाणीव होऊं लागली. त्याची पावलें जड पडूं लागलीं. शेवटों मोठ्या कष्टानें तो तुरुंगाच्या द्वाराजवळ आला. पहांटेची वेळ झाली होती. पहारेकरी अद्याप प्रभात कालीन साखरझोपेत गुंग होऊन पडले होते--निद्रिस्तच होते. वसुदेवानें कष्टाचा शेवटचा सुस्कारा टाकला व त्यानें आपले पाऊल तुरुंगांत ठेवलें. त्याबरोबर तुरुंगाच्या दरवाजाला कुलूप पडलें. त्यानें आपल्या कोठडींत पाय टाकल्यावर त्याच्या पायाला बेड्या बिलगल्या ! पुन्हां पूर्वीसारखा जसा होता तसा बंदोबस्त झाला ! स्वातंत्र्यास दूर करणाऱ्याच्या पायांत अशाच बेड्या पडत असतात. असो.

 लवकरच दुसरा दिवस उगवला. सूर्याच्या कोमल ताम्र किरणांनी तुरुंगांतील पहारेकऱ्यास व राजमहालांतील कंसास एकदमच जागें केलें. " क्यौं बे ! क्या घोर निद्रा लगी थी " असे पुटपुटत ते डोळे चोळीत उठतात तो आदिमायेचा त्या बालिकेचा “ क्यांहा क्यांहा " असा रुदनस्वर त्यांच्या कानी पडला. आदिमाया खरेंच रडत होती ? छे, तिला कंसाच्या हातून आपली शक्य तितकी लवकर सुटका करून घ्यायची होती. पण पहारेकऱ्यांस कळलें तर पाहिजेना कीं आपण आंत जन्मास आलो आहों तें ? म्हणून हें रुदनाचें मिष होतें. अस्तु . त्या रुदनस्त्रर श्रवणाबरोबर पहारेकऱ्यांनीं कोठडींत डोकावून पाहिलं तो देवकी एका रम्य बालिकेस स्तनपान करीत आहे. ते लगेच कंसाकडे वार्ता देण्यास धांवले. कंस ती बातमी ऐकून खडबडून उठला. नवव्या महिन्यापूर्वीच देवकी बाळंत झाली याचें त्यास आश्चर्य वाटलें. “ कायरे काय झाले ? देवकी बाळंत होऊन तिला काय झालें ? " अधीरतेनें कंसाने विचारलें. सरकार ! तिला लडकी झाली आहे ! " पहारेकऱ्यांनी अदबीनें उत्तर दिले. * केव्हांशी ती बाळंत झालीरे ? कंसाने अंगावर कपडे चढवीत पुन्हां विचारले. पहारेकरी गोंधळले. पण वसुदेवाच्या वाड्याकडे उत्कंठेनें धांवतच निघालेल्या कंसाच्या ते लक्षांत आले नाही. बिचाऱ्याच्या मनाची आजची तळमळ काय विचारतां ? कंस लवकरच तुरुंगांत आला व पहातो तो खरेंच देवकीला " लडकी " झाली आहे. त्या निर्दयानें हीच मला मारणारी असें समजून तिला क्रूरपणानें आईपासून ओढलें. देवकीनें " ती पोर आहे, तिला मारूं नकोस; कंसा, आजवर तूं माझीं सहा मुलें मारलींस, आतां एवढी पोर तरी जिवंत ठेवरे, ” असें पुष्कळ गयावया केलें, परोपरीनें शोक केला; पण तो पातकी तिळभरही द्रवला नाहीं. त्यानें त्या लहानग्या बालिकेचा तो चिमुकला पाय धरून तिला त्या शिळेवर-सहा अर्भकांच्या मृत्यूचे आघात सहन करून मूक रुदन करणाऱ्या त्या