पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १५ ]

शिळेवर - आपटण्यासाठीं तो तिला आकाशांत गरगर फिरवूं लागला; पण हा काय चमत्कार? ती पहा - ती पोर-ती आदिमाया कंसाच्या हातून वरच्यावर आकाशांत झटकली - विजेसारखा झक्क प्रकाश पडून वर पाहणाऱ्या कंसाचे डोळे दिपले- व भीतीने थरथर कापणाऱ्या कंसास " दुष्टा ! मला मारण्याचें सामर्थ्य तुझ्यासारख्या क्षुद्र घुंगुरट्याचें नाहीं. ही पहा मी चाललें ! पण तुझा शत्रु-- देवकीचा आठवा मुलगा -- गोकुळांत नंदाच्या इथें सुखाने वाढत आहे; तो ' आठवा ' तुझें पुरे कंदन उडवल्याखेरीज कर्धी राहणार नाहीं. याद राखून रहा ! तुझें आयुष्य संपुष्टांत आलें. आहे ! " अशी खणखणीत आकाशवाणी ऐकू आली. ती ऐकून कंसाची कंबरच खचली, त्याच्या हृदयाचा थरकांप उडाला, जिभेला कोरड पडली, डोकें फिरूं लागलें, व तो मटकन् खालींच बसला ! नंतर हळूहळूं तो शुद्धीवर आला, तथापि त्या झगझगगीत पोरीच्या देवी कुमारीच्या- त्या तेजोमयी वाणीबरोबर -- आपल्या दिव्य तेजाची प्रभा फांकीत जाणाऱ्या त्या विंध्यवासिनीच्या उद्गाराबरोबर त्याच्या अंगांतली हिंमत, उत्साह व आनंद पार मावळला; व अज्ञात व अदृश्य अशा शक्तीचे काळपाश जणूं काय आपल्या गळ्याभोवती कोणीतरी अडकवून आपणास मृत्यूच्या कराल दाढेत खेंचून नेत आहे असें वाटून त्याचें धैर्य पार गळालें, तोंड सुकून गेलें व त्यास जिकडे तिकडें " आठवा " दिसूं लागला ! व त्या भीतियुक्त पश्चात्तप्त स्थितींत त्यानें देवकीची माफी मागून त्या दंपत्यास ताबडतोब बंधमुक्त केलें.

 घराकडे परत जातांना कंसाच्या मनांत सारखें धसधसत होतें. आपण इतका बंदोबस्त ठेवला असून अखेर शत्रु निसटला, ' पक्षी पळाला ' हे पाहून त्यास राग, भीति व संताप आला. व त्याच वैतागलेल्या स्थितीत आपल्या पहारेकऱ्याचीच या काम हयगय झाली आहे असे समजून त्या दुष्टानें त्याच सपाट्यांत त्यांना फांशी दिलें व दुःखानें मनगटें चावीत तो आपल्या वाड्यांत परत आला ! पण वाचक ! याच वेळीं तिकडे गोकुळांत काय मौज उडून राहिली आहे व केवढा आनंद पसरला आहे ते पहाण्याची तुम्हास साहजिकच उत्सुकता झाली असेल. तर चला, तुम्हांस तिकडेच नेतों.