पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७२ ]

होतें. यमुनाजलावर उठणारे तरंग तेंच समाधीगीत गात होते ! वायुलहरीबरोबर हलणाऱ्या तृणांतून तोच दिव्यनाद स्रवत होता ! हा सर्व देखावा पाहून उद्धव थक्क झाला; व यमुनेवर पाण्यास आलेल्या गोपींनी परिवेष्टित असा तो यमुनातटाकी बसला असतां " ह्या विदेही असून प्रभुप्रेमानें झुरणाऱ्या गोपीस मी आतां बोध तरी कसचा करूं ! ज्यांच्या भक्तिप्रेमावरून माझ्यासारखे कित्येक उद्धव ओंवाळून टाकावेत तो मी आतां ह्यांना ज्ञानाच्या गोष्टी तरी कसल्या सांगू ? " असा त्याला साहजीक प्रश्न पडला. तथापि त्यांचे कसेबसें समाधान करण्यासाठी त्यानें प्रश्न केला "काय बायांनो ? ठीक आहेना ? " " हो ठीकच आहे म्हणायचें. हे देह तुम्हांस चालते बोलते दिसतात तेव्हां तुम्हीं हा प्रश्न विचारावा हे योग्यच आहे. हे देह - किंबहुना सर्व गोकुळ केव्हांच मृतप्राय झालेलें आपणास दिसलें असतें. पण उद्धवजी ! त्या प्रभूच्या-त्या भुवनमोहन गोपाळाच्या अखंड चिंतनावर हे सगळे गोकुळ जगत आहे त्याला कोण काय करणार? त्या प्रभूवर प्रेम करावें, त्याचे अखंड ध्यानांत डुलत रहावे असेच आमच्या चित्तांस वाटतें त्याला उपाय नाहीं. पण तसे जर नसते तर ह्या विरहाग्नीच्या ज्वाला इतक्या तीव्र आहेत की आमच्या प्रेमाश्रूंच्या जलधारा जर त्यावर न पडत्या तर आमचे देह केव्हांच त्यांत जळून खाक झाले असते. " गोपोंनी उत्तर दिलें. उद्भव बापडा त्यावर काय बोलतो? त्याने कसाबसा त्यांना बोध करण्याचा यत्न आरंभिला व तो ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागला. पण तें शुष्क, नीरस ज्ञान त्या गोपीला कसें पटावें? " जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥ आणिक नये माझ्या मना । हो का पंडित शहाणा "ह्या तुकोक्तीप्रमाणे त्यांची स्थिति होती. “ ठेवा जाणीव गुंडून " असे सांगणाऱ्या त्या प्रेमळ पण अधिकारी गोपी होत्या. “ आवडे ज्या हरी अंतरापासोनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें " असे त्यांचे विचार होते. त्यांना उद्धव सांगू लागला तें ज्ञान ठाऊक नव्हते काय ? पण त्या ज्ञानानंतरही असणाऱ्या दिव्यभक्तिमुखामृतांत रंगगेल्या त्या गोपींचें त्या निष्प्रेम ज्ञानाने कसे समाधान व्हावें ? कृष्णविरहानें जळगाच्या गोपींच्या देहास त्यांनीं कशी शांति वाटावी ? ज्या कन्हय्यासाठी त्यांचा ' जीव कासावीस ' होत होता तो श्यामसुंदर जगदात्मा प्रत्यक्ष प्रगटल्यावांचून त्याच्या सर्वव्यापीपणाच्या पोकळ गप्पांनीं त्यांना कर्से सुख होणार ? " परि ठाकिलियाहि सागरू | जैसा मागीलही यावा अनिवारू । ते ये गंगेचिये ऐसा पडिभरु | प्रेमभावा " असें ज्यांचें उत्कट प्रेम व त्यामुळेच ज्या " युक्ततमा " झालेल्या त्यांना कोरड्या ज्ञानाचे फांके कुठ-