पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७७ ]

मुख्य भार्या होत्या. या अष्टनायिकांशिवाय हजारों कुमारिकांनीं त्यांस आनंदानें वरिलें. प्राग्ज्योतिषाचा-आसामचा राजा नरकासुर हा रावणाचा किंवा मांटेझुमाचा भाऊच शोभला असता. कारण यानें हजारों सुंदर कुमारिकांस बंदींत टाकले होते. श्रीकृष्णांनीं नरकासुग़स मारून त्यांची मुक्तता केली व त्या कुमारिकांनीं आनंदाने त्यांस माळ घातली. असो.
 सत्यभामा व रुक्मिणी या दोघींत रुक्मिणी ही प्रभूची अधिक प्रिय होती. कारण तिचा प्रभुचरणीं भावच तसा अलौकिक होता. पण हे सत्यभामेच्यानें पहावेना. तिला असा गर्व होता कीं, प्रभूचे माझ्यावरच जास्त प्रेम आहे व देव माझ्याच जास्त अंकित आहेत. हा भामेचा गर्व हरण होण्याचा एक मजेदार प्रसंग जुळून आला- किंवा आणला गेला म्हणा पाहिजे तर तो प्रसंग असा कीं एकदां नारदमुनींची स्वारी द्वारकेस गेली असतां भामेनें त्या मुनींचें यथाविधी पूजन करून त्यांस प्रश्न केला की " प्रभूची मजवर सर्वोत जास्त प्रीति आहे. पण प्रभु माझाच सदैव कसा राहील ? त्याला काय बरें युक्ति करावी ? " त्यावर नारदानीं उत्तर दिले की " याला एकच उपाय म्हणजे जी वस्तु आपणाजवळ नेहेमीं असायला पाहिजे तिचें दान करणें ! ” ! त्या वेळी सत्यभामेनें कृष्णाच्या दानाचें उदक नारदांच्या हातावर सोडलें | नारद लगेंच कृष्णास घेऊन चालू लागले तेव्हां त्या प्रेमळ भार्येस वाईट वाटणे साहजीक आहे! पण त्याला आतां काय उपाय ? पुढे रुक्मिणीच्या महालांत ही बातमी कळल्याबरोबर तर ती रुक्मिणी - बेशुद्धच पडली ! शेवटीं सर्व अष्टनायिकांची फारच विनवणी ऐकून कृष्णाच्या भारंभार सोने किंवा इतर पदार्थ घेऊन कृष्णास परत देण्यास नारद तयार झाले. त्याबरोबर सत्यभामेनीं आपले सर्व दागिने कृष्णाच्या तुलेत घातले, पण कृष्णाचें पारडे जमिनीवरून हलेना देखील ! इतर राण्यांच्या अलंकारांची तीच गत झाली. किंबहुना द्वारकेंत एकही सोन्याची गुंज अशी नव्हती कीं जी कृष्ण- प्रभूच्या तुलेसाठीं—व त्यायोगे होणाऱ्या कृष्णनाथाच्या प्राप्तीसाठी-या तराजूंत येऊन पडली नाहीं. पण ज्याचें नांव तें ! कृष्णाचें पारडें यत्किंचितही हलेना ! शेवटी रुक्मिणी पुढे आली व म्हणाली " अनंतकोटी ब्रम्हांडनायकाची तुला आपण पामरांनी काय करावी ! त्याची खरी तुला एका भक्तीच्या-दृढ भावाच्या बळावरच होणार आहे. यासाठी त्या प्रभुच्या चरणीं अनन्य लीन होऊन फूल नाहीं फुलाची पाकळी या न्यायाने माझ्या अल्प भक्तीचें दर्शक असें मी हें 'तुलसीदल' मा तराजूच्या पारड्यांत घालतें!" असे म्हणून तिनें कृष्णाच्या उलटच्या पारडयांत तें