पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
 

चिंता नाही. अर्थात बहुजनसमाज जोपर्यंत त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागत आहे तोपर्यंतच ते तत्त्वज्ञान निर्णायक ठरणार हे उघड आहे. पुष्कळ वेळा माणसे ग्रंथात किंवा बुद्धिवादात एक तत्त्वज्ञान मान्य करून आचारात अगदी भलतेच तत्त्वज्ञान अनुसरत असतात. अशा वेळी हा विचार अर्थातच फोल ठरेल. पुष्कळ वेळा दोन राष्ट्रांचे तत्त्वज्ञान एकच असून माणसांची त्यावरील निष्ठा कमी- अधिक प्रमाणात तीव्र असते. त्यामुळेही राष्ट्राच्या भवितव्यात फरक पडत जातो. या सर्व मर्यादा ध्यानात घेणे अवश्यच आहे. पण त्या घेऊनही एवढा विचार निश्चित उरेल की, ज्या अनेक गोष्टींवर राष्ट्राचा उत्कर्षापकर्ष अवलंबून असतो त्यांत तत्त्वज्ञान ही प्रधान गोष्ट आहे.
 माणसे कार्याकार्य ठरविताना स्वतःची बुद्धी वापरतात का सर्वस्वी धर्मग्रंथाच्या आहारी जातात यावर राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे हे मान्य केलेच पाहिजे. उच्चनीचता जन्मावर आहे की गुणावर आहे यासंबंधी जो सिद्धान्त राष्ट्राने अंगीकारलेला असेल त्यावर त्याची उन्नती- अवनती काही अंशी अवलंबून राहाणारच. 'व्यक्तीचे हक्क' या कल्पनेचे फाजील स्तोम माजविलेले असेल किंवा व्यक्तीला मुळात हक्कच नाहीत, ती सर्वस्वी समाजासाठी आहे. ही कल्पना फार मूळ धरून असेल, तर त्याप्रमाणे समाजाला वळण लागल्यावाचून राहाणार नाही. माणसांची निष्ठा, कर्तृत्व, कुशल नेत्याची जोड मिळणे, आर्थिक स्थिती इत्यादी इतर अनेक घटक हे आपापल्यापरी निर्णायक होतातच- पण या निर्णायक घटकांत त्या त्या राष्ट्राने अंगीकारलेले तत्त्वज्ञान हा एक घटक निश्चित् आहे हे मान्य केले पाहिजे.
 राष्ट्राच्या भवितव्यनिर्णयात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले