पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
९३
 

तर होतोच पण पुष्कळ वेळा उदार, क्षमाशील, सत्यवचनी अशा माणसांकडूनही, व्यवहारनीतीच्या अज्ञानामुळे, श्रेष्ठ निष्ठा कोणती, कनिष्ठ कोणती, शक्य काय अशक्य काय, यांचा हिशेब त्यांच्या ठायी नसल्यामुळे, अंतराळातच ते वावरत असल्यामुळे, स्वकीयांचा घात होतो. मराठ्यांच्या, राजपुतांच्या इतिहासात, सध्याच्या हिंदुस्थानच्या इतिहासात या प्रकारची अनेक उदाहरणे आहेतच. येथे महाभारतातलेच एक उदाहरण देतो.

गृहनीती व परनीती यांच्या संकरामुळे अनर्थ

 द्रोणाचार्यांच्या वधाची ही कथा आहे. या एका कथेत अनेक विचित्र प्रकार घडले आहेत; त्या वेळी भिन्न भिन्न व्यक्तींनी चमत्कारिक वृत्ती प्रकट केल्या आहेत, त्यासंबंधी भिन्न मते तेथील लोकांनी प्रकट केली आहेत. आणि यामुळे गृहनीती व परनीती यासंबंधी फारच उद्बोधक असे विचार त्यातून आपणांस उचलता येतील.
 रणांगणात एके दिवशी गुरु द्रोणांनी भयंकर उग्ररूप धारण केले व पांडवांच्या हजारो सैनिकांचा ते संहार करू लागले. त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणांची छाती होईना व आज पांडव पृथ्वीतलावरून नष्ट होणार असा रंग दिसू लागला. त्या वेळी श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, "या महाधनुर्धराच्या हातांत धनुष्य, आहे तोपर्यंत याला जिंकणे इंद्रालाही शक्य नाही. जर याने शस्त्र खाली ठेवले तरच याचा वध होणे शक्य आहे. तेव्हा पांडवहो, या वेळी धर्म वगैरे सर्व गुंडाळून ठेवून (धर्म उत्सृज्य) जेणे करून जय मिळेल अशी युक्ती तुम्ही योजिली पाहिजे. मला वाटते की अश्वत्थामा मेला तर हा लढणार नाही. तेव्हा युद्धात तो मारल गेल्याचे कोणी तरी याला सांगावे."