पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 श्रीकृष्णाची ही मसलत अर्जुनास आवडली नाही, पण इतरांना ती मान्य झाली व सत्यनिष्ठ, अहिंसाप्रिय अशा धर्मराजानेही तिला अनुमोदन दिले. नंतर भीमाने अश्वत्थामा नावाचा एक हत्ती ठार मारला व द्रोणांच्या जवळ जाऊन 'अश्वत्थामा मारला गेला' असे तो मोठ्याने ओरडू लागला. प्रथम द्रोणांची खात्री पटेना. तेव्हा त्याने, हे खरे की खोटे, असे युधिष्ठिरास विचारले, त्रैलोक्याचे जरी राज्य मिळाले तरी युधिष्ठिर असत्य भाषण करणार नाही अशी त्याची खात्री होती.
 या वेळी श्रीकृष्णाने युधिष्ठिरास बजावले की, 'युधिष्ठिरा, द्रोण असाच लढत राहिला तर तुझ्या सर्व सेनेचा फडशा होईल. तेव्हा त्याच्यापासून तू आमचे रक्षण कर. अरे, अशा प्रसंगी सत्य भाषणापेक्षा असत्याचीच अधिक महती आहे !' युधिष्ठिराची सत्यनिष्ठा अगदी एकांतिक होती. पण या वेळी व्यवहार त्याने ओळखला व 'कुंजर अश्वत्थामा मारला गेला' असे त्याने उत्तर दिले व उत्तर देताना कुंजर शब्द अगदी हलके उच्चारला. त्यामुळे आपला पुत्र अश्वत्थामा हाच मेला असे वाटून द्रोणाने शस्त्र टाकून दिले व ती संधी साधून धृष्टद्युम्नाने अर्जुनाच्या निषेधाला न जुमानता त्याचा वध केला. (द्रोणपर्व, अ. १९०, १९२)
 द्रोणांच्या या असल्या वधामुळे अर्जुन अगदी चिडून गेला व पुढे अश्वत्थामा जेव्हा चवताळून पांडवांच्या सैन्यावर तुटून पडला व संहार करू लागला तेव्हा त्याची कड घेऊन तो स्त्रपक्षीयांना दुरुत्तरे करू लागला व प्रत्यक्ष युधिष्ठिराची निर्भर्त्सना करू लागला. तो म्हणाला, 'ज्यांना अनाथाप्रमाणे गाठून धृष्टद्युम्नाने अत्यंत अघोरपणे मारिले त्या आचार्यांचा वाली आता उभा आहे. माझ्या गुरूचे केश धृष्टद्युम्नाने धरले, त्याची वीर अश्वत्थामा कदापि