पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
९५
 

क्षमा करणार नाही. राजा, क्षणिक अशा राज्यासाठी पितृतुल्य अशा गुरूचा तू वध करविलास. तू धर्मज्ञ असूनही अत्यंत अधर्म केला आहेस ! माझ्याने हे पाहवत नाही. आमच्या हातून हा भयंकर अधर्म घडला आहे. आपण नीच लोभ्यांनी केवळ राज्यासाठी या वृद्ध आचार्यांचा वध केला. हे आपल्या हातून अति भयंकर पापकर्म घडले आहे. अशा प्रसंगी जिवंत राहण्यापेक्षा मृत्यूच श्रेयस्कर होय.' -(द्रोण १९६).

अर्जुनाचा व्यामोह

 धृष्टद्युम्न, भीमसेन व धर्मराज यांची अर्जुन निर्भर्त्सना करीत होता ती कोणत्याही अधम वासनेमुळे नसून अत्यंत सात्त्विक अशा गुरुभक्तीच्या उमाळ्यामुळेच करीत होता. पण असे सात्त्विक भाव, अशी गुरुनिष्ठा ही एरवी कितीही अभिनंदनीय असली तरी शत्रुपक्षीय लोकांच्या बाबतीत त्यांना आवर घातला नाही तर हे सद्गुणच घातक होतात ही श्रीकृष्णाची व्यवहारनीती त्याला कळत नव्हती. हा गुरू असला तरी आपल्या लहानशा अभिमन्यू बाळाला एकट्याला गाठून ठार मारणारा हा गुरू आहे हे अर्जुन त्या वेळी विसरला आणि त्याला शस्त्र टाकल्यानंतर मारण्यात अधर्म झाला असे तो म्हणाला. आपल्या प्रिय द्रौपदीचे वस्त्र ओढणाऱ्या दुर्योधनाचे रक्षण करण्यासाठी, म्हणजे पर्यायाने त्या नीच कृत्याचे समर्थन करण्यासाठीच तो लढत आहे हेही त्याने ध्यानात घेतले नाही. त्याला अधर्माने मारण्याची श्रीकृष्णाची मसलत त्याला पटली नाही. पण याला मारला नाही तर हा आपणास ठार करील व पुन्हा आपल्या स्त्रीवर तो दुर्योधन तसलाच घोर प्रसंग आणील, आणि तसे करण्यास, तो अधर्म घडवून आणण्यास, हा द्रोण जिवंत राहिल्यास पर्यायाने साह्यच करील हेही अर्जुन विसरला.