पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

म्हणजे गुरुभक्ती, सत्य अहिंसा, शरणागतास अभय इत्यादी श्रेष्ठ तत्त्वे ही एकांतिकतेने वापरली तर ती धर्मालाच विघातक होतात ही व्यवहारनीती तो विसरला. आज शेकडो वर्षे भारतीयांची हीच स्थायीवृत्ती आहे.
 धर्मप्रेम, गुरुभक्ती, सत्यनिष्ठा, यांचा उमाळा अनावर होऊन अर्जुन जेव्हा युधिष्ठिराची व स्वपक्षीयांचीच निर्भर्त्सना करू लागला व 'अश्वत्थाम्यापुढे आता तुम्ही कसे टिकता ते पाहतो,' असे आपणच म्हणू लागला, तेव्हा भीम पराकाष्ठेचा क्रुद्ध होऊन गेला. त्या वेळेस भीमसेनाने अर्जुनास जे उत्तर दिले ते उपहास व्याजोक्ती, वक्रोक्ती यांनी इतके नटलेले आहे की वक्तृत्वाचा तो आदर्श होऊन बसला आहे.

भीमसेनाचे अमोघ वक्तृत्व

 भीमसेन म्हणाला, 'शाबास धर्मशीला अर्जुना ! शाबास ! आज तू एखाद्या अरण्यवासी मुनीप्रमाणे किंवा अगदी एखाद्या स्वधर्मदक्ष, क्षमाशील ब्राह्मणाप्रमाणे धर्माच्या गोष्टी सांगत आहेस. अर्जुना, तुझा पराक्रम इंद्रासारखा आहे. पण महासागर ज्याप्रमाणे मर्यादेचे उल्लंघन करू शकत नाही त्याप्रमाणे तुला आज धर्माचे अतिक्रमण करवत नाही. वास्तविक अश्वत्थाम्याचे निवारण करणे वगैरे गोष्टींची तुजपुढे काहीच प्रतिष्ठा नाही. परंतु अधर्म घडेल म्हणून ते करण्यास तुझे मन धजावत नाही ! तेरा वर्षे सतत जाळीत असलेला क्रोध एका बाजूस सारून तू आज धर्माचीच कास धरीत आहेस तेव्हा तुझी कोण प्रशंसा करणार नाही ! सुदैवाने तुझे मन आज धर्माकडे वळले आहे. आणि तुझ्या पूर्वपुण्याईच्या बळाने तुझी बुद्धी अशीच क्षमाशील राहील ! तू धर्माने