पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

आवर घातला आणि धर्मभीमांशी द्रोह तर त्याने केला नाहीच पण अश्वत्थाम्याच्या नारायणास्त्राच्या प्रयोगात भीमाचा नाश होण्याची वेळ आली असताना त्याने स्वतः जीव धोक्यात घालून त्याला वाचविले व अश्वत्थाम्याची कड घेण्याची क्षणैक आलेली लहर सोडून देऊन पुनरपि त्याने त्याला युद्धासाठी आव्हान केले.
 पण अर्जुनाने ही समंजसता दाखविली नसती व त्याने धर्म-भीमांचा त्याग केला असता तर जो अनर्थ झाला असता त्याची मीमांसा करताना आपणांस काय म्हणावे लागले असते ? व्यवहारनीतीचे, गृहनीतीचे व परनीतीचे योग्य ज्ञान नसल्यामुळे शौर्य, पराक्रस सर्व वाया जाऊन पांडवांचा नाश झाला असाच निर्णय करावा लागला असता व अर्जुनाच्या धर्मप्रेमामुळे दुर्योधनाच्या अधर्माचा उत्कर्ष झाला असे म्हणावे लागले असते.
 पण सुदैवाने तसे झाले नाही. श्रीकृष्णासारखा महान व्यवहारवेत्ता गुरू पांडवांना मिळाला, धर्मराजाने आपल्या सत्यनिष्ठेला मुरड घातली, अर्जुनाने गुरुभक्तीला व धर्मप्रेमाला मुरड घातली, धर्माचा उत्कर्ष यामुळेच होईल, नाही तर आपला पराभव होऊन धर्मनष्ट चांडाळांचे राज्य पृथ्वीवर माजून अधर्माचा विजय होईल हेही त्यांनी समंजसपणे लक्षात घेतले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला

धर्माचा रथ

 धर्मराजाने द्रोणाचार्यांना असत्य सांगितले म्हणून पूर्वी त्याचा रथ जमिनीला न टेकता चार बोटे उंचून असा चालत असे, तो एकदम खाली आला व जमिनीवरून चालू लागला अशी कथा सांगतात. पण ही कथा अर्धवट आहे. कथेचा उत्तर भागही सांगणे अवश्य आहे. युधिष्ठिराने तसे असत्य भाषण केले नसते तर रथा