पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
९९
 

सकट तोच पृथ्वीच्या उदरात गाडला गेला असता, आणि मग असत्य किंवा सत्य कोणतेच भाषण त्याला करता आले नसते. केवळ सत्याच्या बळावर त्याचा तरीही विजय झाला असता, परमेश्वराने त्याला व त्याच्या पक्षाला या सत्यनिष्ठेमुळे वाचवले असते असे म्हणावे तर तेही खरे नाही. कारण सत्याचा वाली जो परमेश्वर त्या परमेश्वरानेच श्रीकृष्णानेच त्याला असत्य भाषण करण्याचा उपदेश केला होता.
 परनीतीचे विवेचन आतापर्यंत सविस्तर केले. स्वतःचे रक्षण व शत्रूचा संहार हे तिचे ध्येय आहे. ते साध्य करताना सत्य, अहिंसा, धर्म यांना मुरड घालून ध्येयवाद, एकांतिकता सोडून देणे अवश्य आहे. कपट करून शत्रूत भेद करणे, मायावीपणा करून शत्रूला फसविणे, विश्वास दाखवून त्याचा घात करणे, इत्यादी कोणताही सूक्तासूक्त मार्ग अवलंबिल्यावाचून गत्यंतर नाही, कारण जगात सत्याचा किंवा धर्माचा विजय होत नसून बलाचा- ऐहिक बलाचा विजय होत असतो इत्यादी सिद्धांतांचे स्पष्टीकरण आपण ऐकले. आणि ही प्रवचने कोणा सामान्य माणसांची नसून भीष्म, श्रीकृष्ण यांसारख्या धीमान, जगताच्या उद्धारार्थ अवतरलेल्या थोर विभूतींची ती आहेत हेही आपल्या घ्यांनात आले. आता या सर्व परनीतीचा सारांश ज्यात आहे असे शत्रुंजय राजाच्या हितार्थ भरद्वाजमुनींनी केलेले प्रवचन शेवटी जोडल्यास अस्थानी होणार नाही.

राजनीतीचा सारांश

 भरद्वाज म्हणाले, "राजा शत्रुंजया, आपत्तीच्या प्रसंगी योग्य प्रकारची मसलत करावी, योग्य प्रकारे पराक्रम गाजवावा, योग्य