पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

प्रकारे युद्ध करावे आणि प्रसंग पडला तर योग्य रीतीने पलायनही करावे. त्याविषयी विचार करू नये. नम्रता केवल वाणीत असावी, पण अंतःकरण वस्तऱ्यासारखे तीक्ष्ण असावे. जे कार्य केले असता शत्रूचे व आपले सारखेच हित होईल त्या कार्यासाठी शत्रूशी संधी करावा. तथापि, त्याजवर विश्वास ठेवू नये आणि कार्य झाले म्हणजे सुज्ञ मनुष्याने लागलीच शत्रूपासून दूर व्हावे. मित्राप्रमाणेच शत्रूचेही मधुर भाषणाच्या योगाने सांत्वन करीत असावे. पण सर्पयुक्त असलेल्या गृहाची जशी भीती बाळगावयाची तशीच त्याची भीती बाळगावी. आपल्या बुद्धिसामर्थ्यानुरूप शत्रूचा तिरस्कार करीत असावे आणि कोणतीही गोष्ट होऊन गेल्यानंतर मग तिजबद्दल त्याचे सांत्वन करावे. शत्रू जर निर्बुद्ध असेल तर पुढे लाभ होणार आहे असे दाखवून त्याचे सांत्वन करावे व ज्ञानसंपन्न असेल तर तात्कालिक लाभ दाखवून त्याचे सांत्वन करावे. कल्याणेच्छू राजाने शत्रू पुढे प्रसंगानुसार हात जोडावे, शपथ वाहावी, सामोपचाराचे अवलंबन करावे, शिरसाप्रणाम करून भाषण करावे व अश्रूही ढाळावे. आपला काळ उलट असेल तोवर शत्रूला डोक्यावर घ्यावा, पण योग्य काल आलेला दिसताच दगडावर आपटलेल्या मडक्याप्रमाणे त्याचा चुराडा करून टाकावा.
 प्रसंगविशेषी शत्रूला आशा दाखवावी, पण तिला कालाची मर्यादा सांगावी आणि नंतर ती सफल होण्याला विघ्ने आणावी. आलेल्या विघ्नांचेही काही तरी कारण सांगावे आणि त्या कारणांच्याही मुळाशी कोणता तरी अंतःस्थ हेतू असल्याचे सांगावे. शत्रूपासून जोपर्यंत भीती नाही तोपर्यंत आपण भ्याल्यासारखे वागावे, पण त्यापासून भीती आहे असे दिसून येताच निर्भय मनुष्याप्रमाणे त्याच्यावर प्रहार करावा.