पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

असे जे तत्त्वज्ञान त्या तत्त्वज्ञानाचे आपल्या भरतभूमीत महाभारतकाळी काय रूप होते ते प्रस्तुत प्रबंधात सांगावयाचे आहे. सध्या या भूमीला फार दुर्गती प्राप्त झालेली आहे. तेव्हा इतर अनेक कारणांबरोबर तिने पत्करलेल्या तत्त्वज्ञानात फार अपसिद्धांत असले पाहिजेत असे अनुमान करण्यास तरी हरकत नाही. आणि याच दृष्टीने जो काळ या भूमीला अत्यंत वैभवाचा, भाग्याचा, उत्कर्षाचा व दिगंत कीर्तीचा असा होऊन गेला त्या काळचे तत्त्वज्ञान सध्याच्यापेक्षा श्रेष्ठ असले पाहिजे असा विचार मनात आल्यास त्याला या मीमांसेत स्थान प्राप्त व्हावे यात काही अनुचित नाही. आणि अशा विचाराने आपण महाभारत हा आपला राष्ट्रीय ग्रंथ उचलून घेऊन त्याचे अध्ययन करू लागलो तर आपले अनुमान अगदी योग्य असून त्या वेळचे तत्त्वज्ञान समाजाच्या उन्नतीला सर्वथा उपकारक, अत्यंत उदात्त व पराक्रम, विजिगीषुवृत्ती, यांना प्रेरणा देऊन राष्ट्राला यश, वैभव व कीर्ती प्राप्त करून देण्यास समर्थ असेच होते असे आपल्या ध्यानात येते.
 समाजाला वैभवाला नेण्यास समर्थ असे हे तत्त्वज्ञान महाभारतात सापडते यामुळे त्याला विशेषच महत्त्व प्राप्त होते. महाभारत, हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. या भरतखंडाच्या चारी सीमांच्या आत असा एकही हिंदुसमाज, जाती किंवा व्यक्ती सापडणार नाही की जिच्यावर महाभारतातील विचारांचा, तत्त्वज्ञानाचा, धर्ममतांचा, कथांचा संस्कार झालेला नाही. वेद, उपनिषदे हे थोर ग्रंथ या भूमीतलेच आहेत. त्यांचा महाभारता- इतकाच अभिमान येथले पंडित बाळगतात. पण ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकणार नाहीत. कारण समाजातील सर्व वर्ण, सर्व जाती, सर्व स्त्री-पुरुष, सर्व बाल-तरुण-वृद्ध महाभारताच्या