पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

केलेले आढळते. भारतीय तत्त्ववेत्त्यांच्या या धर्मात दुबळ्या दैववादाला थारा नाही. 'संतोष, समाधान हेच सुख', असले रडवे प्रतिपादन नाही, षड्रिपूंची संतमंडळींच्या तोंडची ठराविक निंदा नाही, अज्ञान, भोळेपणा, यांतच भूषण मानण्याची जी घातकी प्रवृत्ती तिला आसरा नाही. तर ऐहिक ऐश्वर्य, वैभव, दिगंतभूमीचे साम्राज्य, त्रिखंडात दुमदुमणारी कीर्ती यांच्या आकांक्षा मानवी चित्तात निर्माण करून त्यासाठी मरणमारणाचा संग्राम करण्याची प्रेरणा देणारा संदेश या भव्य ग्रंथात आहे. 'सर्पाच्या दाढा उपटण्याचा प्रयत्न करीत माणसाने तडकाफडकी मरून जावे पण पराक्रमहीन राहू नये.' 'श्येनपक्ष्याप्रमाणे आकाशात गिरक्या घेत राहून शत्रूवर झेप घालावी', 'तृप्ती आणि दया यांनी वैभवाचा नाश होतो', 'मोडून पडावे पण वाकू नये अशी चैतन्याने रसरसलेली वचने या ग्रंथात आहेत. आणि नुसती वचने आहेत असे नव्हे तर श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी नरपुंगवांनी आपल्या असामान्य बाहुबलाने व अचाट बुद्धिबलाने ही वचने सत्यसृष्टीत आणण्यासाठी जो विशाल उद्योग आरंभिला व प्रचंड पराक्रम केला त्याची अत्यंत स्फूर्तिप्रद वर्णनेही या ग्रंथात आहेत.

यथा समुद्रो भगवान् यथाहि हिमवान् गिरिः
ख्यातावुभौ रत्ननिधी तथा भारतमुच्यते ।

- १८/५/६५.

 'जसा भगवान समुद्र आणि जसा पर्वतराज हिमालय हे रत्ननिधी म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच महाभारत हेही रत्नांची खाण म्हणून प्रसिद्ध आहे.' असे जे महाभारताबद्दल म्हटले आहे ते यासाठीच. असो. अशा या ग्रंथात प्रवृत्तिधर्माचे जे प्रतिपादन केलेले आढळते ते प्रस्तुत प्रकरणात आता द्यावयाचे आहे.