पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१०५
 


मोक्षालाही पराक्रम अवश्य

 मोक्ष हे जरी अंतिम ध्येय असले तरी मोक्ष ही मनाची एक अति उन्नत अशी अवस्था असल्यामुळे ती समाजाच्या अत्यंत वरच्या व प्रगत अशा अवस्थेतच शक्य आहे. ज्या समाजातील लोकांचे आचार शुचिर्भूत आहेत, विचार प्रगल्भ व पवित्र आहेत, जेथे उत्तम राज्यव्यवस्था असून लोकव्यवहार सरळपणे चालतात, जो समाज विद्यासंपन्न व पराक्रमी असून परकीय आक्रमणापासून आपले रक्षण करण्यास समर्थ असतो. अशाच समाजात मोक्षकल्पनेचा उद्गम व परिणती आणि मोक्षसाधनाचे प्रयत्न शक्य आहेत असा महाभारतीय तत्त्ववेत्त्यांचा पहिला सिद्धान्त आहे. यस्यैवबलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नरः । -(शां. १५२।१८) अज्ञानात खितपत असलेला, रानटी, भुकेकंगाल हीन, दीन, दरिद्री, पराक्रमशून्य, परतंत्र अशा समाजाचा व मोक्ष या अत्यंत उदात्त कल्पनेचा काहीएक संबंध नाही. एखादी व्यक्ती अशाही समाजात मोक्षसाधन करील, नाही असे नाही. पण एका व्यक्तीच्या मोक्षासाठी धर्मप्रवृत्ती झालेली नाही. अखिल समाजाला मोक्षधर्माची जर शिकवण द्यावयाची असेल -आणि तेच भारतीय तत्त्ववेत्ते आपले कर्तव्य समजतात -तर त्या समाजाची अवस्था वर सांगितल्याप्रमाणे सुसंस्कृत अशी असलीच पाहिजे.

क्षुधा निर्णुदति प्रज्ञां धर्मबुद्धिं व्यपोहति
क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजतिचैव ह ।

- १४/९०/९१.

 क्षुधेमुळे माणसाचा बुद्धिभ्रंश होतो आणि त्याच्या धर्मनिष्ठेचाही लोप होतो. त्याचप्रमाणे क्षुधा माणसाचे ज्ञान नष्ट करून त्याचे धैर्यही हिरावून घेते -हे कठोर सत्य या प्रज्ञावंत पुरुषांना चांगले