पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

माहीत आहे. त्यामुळे धर्माच्या प्रसारासाठी राष्ट्रात सुस्थिती असणे अवश्य आहे असे त्यांचे निश्चित मत आहे. (धर्म हा शब्द असल्या संदर्भात पारमार्थिक मोक्षधर्म अशा अर्थाने घ्यावयाचा.) आणि राजधर्मात दण्डनीतीचे माहात्म्य सांगताना त्यांनी याचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.

राजधर्म सर्वश्रेष्ठ

 सुस्थिती असेल, शांतता असेल, माणसांचे व्यवहार नियंत्रित असतील, तरच धर्माकडे प्रवृत्ती होत असते हे जाणून धर्मव्यवस्थेत भारतीय तत्त्ववेत्त्यांनी राजधर्माला अग्रस्थान दिलेले आहे. राज्यव्यवस्था उत्तम टिकवून धरणे याइतके पुण्यप्रद त्यांच्या मते दुसरे काहीच नाही. कारण पुढील सर्व इमारतीचा तो पाया आहे. म्हणून प्रथम प्रत्येकाने सर्व कर्तव्ये बाजूस सारून त्यासाठी सर्वस्व अर्पण केले पाहिजे. भीष्म म्हणतात -

यथा राजन् हस्तिपदे पदानि, संलीयन्ते सर्व सत्त्वोद्भवानि ।
एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान् सर्वावस्थान् संप्रलीनान् निबोध ॥

-शांति ६३।२५.

 'हे राजा, ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा सर्वप्रकारे अंतर्भाव होतो, हे तू पक्के समज.'
 महाभारतात राजधर्माची महती दुसऱ्या एका ठिकाणी अशीच वर्णन केली आहे. कोसल देशाचा राजा वसुमन्त याने बृहस्पतीला पुढीलप्रमाणे प्रश्न केला, 'हे देवगुरो, प्राण्यांचा अभ्युदय होण्याचे साधन कोणते ? कोणत्या कर्माच्या योगाने त्यांचा नाश होतो, आणि कोणाचे आराधन केले असता त्यांना अविनश्वर म्हणजे शाश्वत