पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१०७
 

सुखाची प्राप्ती होते ?' यावर बृहस्पतीने जे विवेचन केले ते फार महत्त्वाचे आहे. शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी ऐहिक धनवैभवांचा त्याग केला पाहिजे असे न सांगता प्रथम राज्यव्यवस्था उत्तम पाहिजे हे बृहस्पतीने बजावले हे विशेष आहे.
 बृहस्पती म्हणाला— 'हे महाप्राज्ञ, राजा हाच लोकांच्या धर्माचे मूळ आहे असे दिसून येते. राजाच्या भीतीमुळेच प्रजा परस्परांना भक्षण करीत नाहीत. मर्यादा सोडून वागणाऱ्या व परस्त्रीवर आसक्त होणाऱ्या सर्व लोकांना, धर्माच्या अनुरोधाने शिक्षा करून राजाच ताळ्यावर आणतो. राजाने पालन केले नाही तर बलवान लोक निर्बलांच्या धनाचा अपहार करतील. कोणालाही ही वस्तू माझी आहे असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. राजा नसेल (म्हणजे शासन व्यवस्थित नसेल) तर स्त्री, पुत्र, द्रव्य व परिवार ही सर्व नाहीशी होऊन सर्वत्र शून्य होऊन जाईल. धर्माचरण करणाऱ्या लोकांवर नानाप्रकारे शस्त्रप्रहार होतील. अधर्माला आधार मिळेल. सर्व लोक दरवडेखोर बनतील. ब्राह्मण अध्ययन करणार नाहीत. कृषी व वाणिज्य यांचा नाश होईल, धर्म रसातळास पोचेल व वेदत्रयाचे अस्तित्वच नाहीसे होईल. यज्ञविधी चालणार नाहीत, विवाहाचे अस्तित्व रहाणार नाही व समाज नष्ट होईल.
 राजा रक्षण करीत असला म्हणजे लोक स्वछंदपणे घराची दारे उघडी टाकून निर्भयपणे झोप घेतात. स्त्रिया सर्व प्रकारच्या अलंकारांनी भूषित होऊन पुरुष मनुष्य बरोबर घेतल्यावाचून, निर्भयपणे मार्गावरून जाऊ शकतात. लोक धर्माचाच अंगीकार करतात, परस्परांना क्लेश देत नाहीत, इतकेच नव्हे, तर एकमेकांवर अनुग्रह करतात. राजा, शेती व व्यापार यांवर सर्व जग अवलंबून असते