पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

व राजा नीट पालन करीत असेल तरच यांची व्यवस्था नीट राहते. सारांश ज्याचे अस्तित्व नसल्यास कोणत्याही प्राण्याचे अस्तित्व रहाणार नाही व ज्याचे अस्तित्व असेल तरच सर्व समाजाचे अस्तित्व असते त्या राजाचा बहुमान कोण करणार नाही ! (यस्याभावेन भूतानामभावः स्यात् समन्ततः । भावे च भावो नित्यं स्यात् कस्तं न प्रतिपूजयेत् । – शांति ६८।३७)
 राजा ही एक व्यक्ती नाही. ती तशी आहे असे समजून राजाचा अवमान करणे अश्लाघ्य होय. राजा हा प्रजेचे प्रौढ असे अंतःकरणच होय. जो मनुष्य राजाचे प्रिय व हित करण्याविषयी उद्युक्त होतो व जो सर्व लोकांत त्याचा दरारा उत्पन्न करण्याचा कार्यभार आपल्या शिरावर घेतो त्याला इहपरलोकांची प्राप्ती होते.' -(शांति अ. ३८)
 समाजाचे अस्तित्व टिकविणे हा प्रत्येक मानवाचा श्रेष्ठधर्म होय हे महाभारती तत्त्ववेत्त्यांनी किती ठामपणे सांगितले आहे हे यावरून दिसून येते. मोक्ष हे जरी अंतिम साध्य असले तरी समाजाच्या सुस्थितीकडे दुर्लक्ष झाले तर समाजाचे अस्तित्वच नष्ट होईल व मग सर्वच धर्म उत्सन्न होतील ही जाणीव फार प्रखरपणे या थोर पुरुषांच्या मनांत होती व म्हणूनच प्रवृत्तिधर्माचा त्यांनी जोराने पुरस्कार केला आहे. राजधर्म हा सर्व धर्मांत श्रेष्ठ होय या म्हणण्यातले रहस्य हेच आहे. आणि हा धर्म सांभाळून समाजाची सुस्थिती टिकवून धरणे याची जबाबदारी जरी राजावर असली तरी त्याचे एकट्याचेच ते काम नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीचे ते कार्य आहे, कोणीही यातून सुटू शकत नाही, असे त्यांना सांगावयाचे आहे. म्हणूनच राजाचे हित करणारा, त्याच्या शासनाचा दरारा सर्वत्र पसरणारा यालाही इहपरलोकांची प्राप्ती होते असे बृहस्पतीने सांगितले आहे. मोक्षासाठी एकटा प्रवृत्तिधर्मच