पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१०९
 

पुरेसा आहे, काही काल प्रवृत्ति स्वीकारली तरी पुढे निवृत्ती स्वीकारणे अवश्य आहे, असे मुळीच नाही असे महाभारतकारांचे मत तर आहेच, पण निवृत्तिवादी लोकही या प्राथमिक धर्मातून सुटू शकत नाहीत असे त्यांचे स्पष्ट मत आहे. एकाददुसरा माणूस संसार सोडून गेला तर निराळे. त्यामुळे समाजाचे काही बिघडणार नाही. पण अनेकांची अशी प्रवृत्ती होऊ लागली किंवा निवृत्ती श्रेष्ठ आहे, असा नुसता विचार प्रबळ झाला तर समाजच नष्ट होईल आणि मग प्रवृत्ति नाही, निवृत्ति नाही आणि त्यांनी प्राप्त होणारा मोक्षही नाही अशी अनर्थकारक स्थिती प्राप्त होईल. हा विचार महाभारतात राजधर्मप्रकरणी अनेक वेळा सांगण्यात आला आहे. ब्राह्मण यज्ञयाग करीत असले, तपश्चर्या करीत असले म्हणजे त्यातून जे पुण्य निर्माण होईल त्याच्या बळावर सर्व व्यवस्था ठीक होईल असे महाभारतकारांना मुळीच वाटत नाही. कारण राज्यव्यवस्था ठीक नसेल तर वेदत्रयांचे अस्तित्वच नष्ट होईल, ब्राह्मण यज्ञ करीनासे होतील व तपश्चर्या त्यांना करता येणार नाही. असे असल्यामुळे प्रथम सर्व सामर्थ्य माणसांनी राज्य स्थापणे, त्याचे स्वातंत्र्य टिकविणे, त्यात शांतता प्रस्थापित करणे यासाठी खर्च केले पाहिजे असे भारतात पुन्हा पुन्हा सांगितले आहे.
 भीष्म म्हणतात, 'जर या लोकात शासनकर्ता राजा नसेल तर बलिष्ठ लोक दुर्बलांना भक्षण करून टाकतील. जो पुरुष दास नसेल त्याला दास केले जाईल (दासाला प्रवृत्ती किंवा निवृत्ती कशाचेच स्वातंत्र्य नाही) व स्त्रिया बलात्काराने हरण केल्या जातील. म्हणून या भूतलावर ज्या लोकांना कल्याणाची इच्छा असेल त्यांनी समाजावर अनुग्रह करण्यासाठी राजा निर्माण केलाचे पाहिजे.' -(शांति ६७).