पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 सत्य, त्रेता, द्वापर, कलि इत्यादी युगे राजाच निर्माण करतो असे जे महाभारतात पुन्हा पुन्हा सांगितलेले आढळते त्याचे, मर्म हेच आहे, 'जेव्हा राजा योग्यप्रकारे व पूर्णपणे दण्डनीतीच्या अनुरोधाने वागतो तेव्हा श्रेष्ठ अशा कृतयुगाची प्रवृत्ती होते. त्या कृतयुगात केवळ धर्मच अस्तित्वात असतो.' असे सांगून राजा दण्डनीतीचे अवलंबन जसजसे कमी करीत जातो तसतशी त्रेता, द्वापर ही युगे निर्माण होतात व जेव्हा राजा दण्डनीतीचा सर्वथैव त्याग करतो तेव्हा कलियुग निर्माण होऊन सर्वत्र अधर्म पसरतो असे भीष्मांनी सांगितले आहे. – (शां. ६९).
 राज्याच्या व समाजाच्या सुव्यवस्थेची जबाबदारी फक्त राजावरच असते असे नाही. राजा जर प्रजेचे पालन योग्य प्रकारे न करील तर तो चोर होय, असे समजून लोकांनी त्यास दूर करावे किंवा वेळ पडल्यास ठारही मारावे व दुसरा कर्ता, प्रजेचे पालन करणारा राजा सिंहासनावर आणावा असे महाभारतात अनेक वेळा सांगितले आहे.

अरक्षितारं हर्तारं विलोप्तारं अनायकम् ।
तं वै राजकलिं हन्युः प्रजाः संनह्य निर्घृणम् ॥

- १३ । ६१ । ३२.


अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः |
स संहत्य निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः ॥

- १३ । ६१ । ३३.

 प्रजेचे रक्षण न करिता तिजपासून जो कर घेतो, व प्रजेला सन्मार्गाला न लावता जो लुबाडतो तो राजरूपी कली प्रजेने सज्ज होऊन निष्ठुरपणे ठार मारावा. 'मी तुमचे रक्षण करीन' असे