पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१११
 

म्हणून जो राजा त्याप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्याला, सर्वांनी एक होऊन, सडक्या, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ठार करावे.

प्रजाही जबाबदार

 यावरून राष्ट्राची सुस्थिती, शांतता व परचक्रापासून रक्षण याची सर्व जबाबदारी केवळ राजावर नसून ती सर्व प्रजेवर आहे हे स्पष्ट होते आणि म्हणूनच राष्ट्ररक्षण हा प्रत्येकाचा आद्यधर्म होय असा भारतीय तत्त्ववेत्त्यांचा स्पष्ट सिद्धान्त आहे हे निर्विवादपणे ठरते.
 वरील विवेचनाचा तात्पर्यार्थ असा होतो. मोक्ष हे प्रत्येक मानवाचे अंतिम साध्य आहे. पण या मोक्षासाठी निवृत्तिधर्माचीच आवश्यकता आहे असे नाही. प्रवृत्तिधर्माने संसारात आमरण राहूनही मोक्ष मिळविता येतो. येथपर्यंत प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही धर्म सारख्याच योग्यतेचे आहेत असे दिसते. पण पुढील कारणामुळे तसे म्हणता येत नाही. मोक्ष ही अति उन्नत अशी मानसिक अवस्था आहे. ती मानवांना प्राप्त व्हावयाची असेल तर त्या समाजाची स्थिती फार उत्तम असणे अवश्य आहे. राष्ट्र बलवान, धनसंपन्न, स्वतंत्र व पराक्रमी असे असल्यावाचून त्यातील माणसांना स्थितप्रज्ञाची अवस्था अथवा मनाची ब्राह्मीस्थिती प्राप्त करून घेणे शक्य नाही. राष्ट्र बलसंपन्न व्हावयाचे तर प्रजेतील प्रत्येक मनुष्याने त्यासाठी कष्ट करण्यास, त्याग करण्यास सिद्ध असले पाहिजे. शरीर, मन, बुद्धी यांची सामर्थ्य प्रथमतः त्याने या कार्यासाठीच अर्पिली पाहिजेत. राष्ट्रातील कर्त्या पुरुषांचा निवृत्ति धर्माकडे कल होऊ लागला तर हे साधणार नाही व समाज