पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
 

कक्षेत जसे येतात तसे त्या ग्रंथांच्या कक्षेत येत नाहीत. महाभारताचे संस्कार हिंदुमात्राच्या आचारात, विचारात, गृहव्यवस्थेत नीतीच्या कल्पनेत, खाजगी वर्तनात, जाहीर वर्तनात, रक्ताच्या बिंबूबिंदूमध्ये सापडतील. यातच त्या ग्रंथाची थोरवी आहे आणि म्हणूनच तो राष्ट्रीय ग्रंथ आहे.
 आणि हे भारतीय तत्त्वज्ञानाचे व भारतीय तत्त्ववेत्त्यांचे संस्कार थोडीथोडकी नव्हे तर आज दोन हजार वर्षे आमच्या मनावर होत आहेत. प्रत्यक्ष भारतीय युद्ध इ. स. पूर्वी ३१०१ या वर्षी झाले. त्या सुमारास प्रथम वेदव्यासांनी 'जय' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात फक्त भारतीय युद्धाचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर त्यांचा शिष्य वैशंपायन याने बहुधा त्यांच्या सान्निध्यातच, त्या जय ग्रंथात सर्व भरतकुळाचा इतिहास घालून तो ग्रंथ २४००० श्लोकांपर्यंत वाढविला व त्याला 'भारत' असे नाव दिले. त्यानंतर जवळ जवळ अडीच हजार वर्षांनी म्हणजे सुमारे इ. स. पू. २५० वर्षे याकाली लोमहर्षण नावाच्या महापंडिताने त्या ग्रंथात त्याच्या काळचे अनेक तत्त्वज्ञानाचे पंथ, धर्मपंथ, नीतितत्त्वे, थोर पुरुषांच्या कथा यांची सुमारे ७५००० श्लोकांची भर घालून सध्याचे रूप त्या ग्रंथाला देऊन 'महाभारत' असे त्याचे नामकरण केले. या रूपात आल्यानंतर दोनतीनशे वर्षांच्या अवधीतच हा ग्रंथ सर्व भरतखंडात पसरून मान्यता पावला. इ. स. ५० या सुमारास इकडे आलेल्या एका डायन क्रायसोस्टोम नावाच्या ग्रीक प्रवाशाने या लक्षश्लोकी ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे. हा ग्रंथ त्याला पांड्य, केरल या मद्रास इलाख्यातील दक्षिणेकडच्या राज्यात आढळला. यावरून आज दोन हजार वर्षे हा ग्रंथराज भरतखंडातील या भूमीच्या पुत्रांच्या मनांवर अधिराज्य गाजवीत आहे असे म्हणण्यास हरकत नाही.