पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
११३
 

कोश त्याची प्राप्ती करून घेतांना जे आड येतील त्यांचा वध केला पाहिजे. कारण त्यावाचून धनप्राप्ती होईलसे दिसत नाही. राजा, धनाच्याच साह्याने इह व परलोक प्राप्त होतात हे धर्मवचन सत्य आहे. हे युधिष्ठिरा, धनहीन पुरुष हा असून नसल्यासारखाच होय."
 बारा वर्षे वनवासात राहून आल्यानंतर युधिष्ठिराला सुद्धा धनाशिवाय सर्व व्यर्थ आहे हे ध्यानी आले. तो श्रीकृष्णाला म्हणाला, 'कृष्णा, निर्धन पुरुष जिवंत असून मेल्यासारखाच आहे. धन हाच श्रेष्ठ धर्म आहे असे म्हणतात. सर्व काय ते धनावरच अवलंबून आहे. धनहानी झाली की तीबरोबर पुरुषाचे धर्म, काम हे ठार होतात आणि मग ते जिणे कसले ? मनुष्य जोपर्यंत लक्ष्मीच्या कृपाछत्राखाली आहे तोपर्यंतच तो पुरुष या संज्ञेस पात्र होतो व त्याची धर्मनिष्ठा अढळ राहाते, त्याच्या अंतःकरणाची चलबिचल होत नाही. आपले कार्य त्याला पार पाडता येते. अधर्माकडे त्याचे मन जात नाही. हे मधुसूदना, आमचे राज्य गेले व अनेक वर्षे आम्ही हालात काढली. तेव्हा आता कोणत्याही न्यायाने पाहिले तरी आम्हांस संपत्ती घालविणे योग्य नाही. म्हणून आता प्राणव्ययानेही संपत्ती मिळविण्यास आम्ही कमी करणार नाही.' -(उद्योग अ. ७२)
 महाभारतात धर्म, अर्थ व काम यांची महती अनेक ठिकाणी गाइलेली आहे. आणि ती वाचताना एक गोष्ट सहज ध्यानात येते ती ही की या तीनही पुरुषार्थांचे भारतीय तत्त्ववेत्ते सारखेच महत्त्व मानतात. धर्माचे (शुद्ध, सत्य, प्रेम, अहिंसा यांचे) महत्त्व अतिशय आहे. याबद्दल वादच नाही. पण त्याकडे जास्त लक्ष देऊन अर्थ व काम यांची हानि कोणी करू लागला तर त्याचा
 ८...