पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

नाश झाल्याखेरीज राहणार नाही असे भारतात अनेक वेळा अनेक विचारी पुरुषांनी सांगितलेले आहे.
 बलरामाने एका प्रसंगी असे उद्गार काढले आहेत-

धर्मार्थौ धर्मकामौच कामार्थी चाप्यपीडयन्
धर्मार्थकामान् योऽभ्येति सोत्यन्तं सुखमश्नुते ।

- शल्य ६०। २२.

 "जो मनुष्य विषयवासनेने धर्मार्थास धक्का लागू देत नाही, अर्थ साधण्यासाठी धर्मकाम बुडवीत नाही, आणि केवळ धर्माच्या पाठीस लागून अर्थकामावर पाणी सोडीत नाही तर धर्म, अर्थ व काम (ऐहिक विषयाबद्दलच्या वासना ) या तिहींचे एकसमयावच्छेदेकरून समसमान सेवन करतो तोच आत्यंतिक सुख भोगतो."
 धृतराष्ट्राला उपदेश करताना कणिकानेही हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. कणिक म्हणाला, 'राजा, धर्म, अर्थ व काम या तिन्हींपैकी एक दुसऱ्यास उपसर्ग करणार नाही, अशाप्रकारे त्यांचा उपभोग घ्यावा. म्हणजे पीडा न होता सुखोत्पत्ती होईल. कोणी धर्माकडेच विशेष लक्ष देईल तर त्यास अर्थहानी व कामनाश ही दुःखे प्राप्त होतील. कोणी अर्थाकडेच सर्व लक्ष देईल तर धर्म व काम यांच्या हानीमुळे त्याला क्लेश होतील व कोणी केवळ कामासक्तच झाला तर धर्मार्थाची हानी होईल. यास्तव या तीनही पुरुषार्थांचे सेवन एकमेकांस उपसर्ग न पोचेल अशा रीतीने केल्यास त्यापासून इष्ट ती सुखे मिळून दुःखापासून अलिप्त राहता येईल.'
 याशिवाय अर्जुन, भीम, द्रौपदी यांनी युधिष्ठिराशी संभाषण करताना आपले अनुभवसिद्ध रोकडे व्यवहारी बोल त्यास अनेक वेळा ऐकविले आहेत. कौरवांना जिंकल्यावरही युधिष्ठिर जेव्हा