पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
११५
 

पुन्हा अरण्यात जाण्याची भाषा बोलू लागला तेव्हा अर्जुन त्यास म्हणाला, 'राजा, अर्थ असेल तरच धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ती होते. लोकांची जीवितयात्राच अर्थावाचून चालणार नाही. हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगाने कुळाचा उत्कर्ष होतो व धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक वा परलोक. द्रव्य नसता धर्मकृत्ये यथासांग करता येत नाहीत. पर्वतापासून जशी नदी तसा द्रव्यापासून धर्म उत्पन्न होतो. (धनात् हि धर्मः स्रवति शैलादपि नदी यथा) राजा, लोक पातकी मनुष्यासंबंधी हळहळतात, आणि निर्धनाच्यासंबंधीही हळहळतात. मला तर पातकी व दरिद्री यांच्यामध्ये काही भेद दिसत नाही. -(शांति ८).
 अरण्यात राहात असताना भीमानेही धर्माला अर्थाचे महत्त्व पटवून देण्याचा परोपरीने प्रयत्न केला होता. तो म्हणाला, 'हे पुरुषश्रेष्ठा, आपल्या अंगी इतर सर्व गुण असले तरी अर्थ नसल्यास धर्माचे आचरण करणे शक्य नाही. राजा धर्म हे सर्व जगताचे मूळ असून धर्माहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही हे खरे, पण हा धर्म, विपुल अर्थ असेल तरच, आचरण करता येणे शक्य आहे. सारांश जरी धर्माची इच्छा असली तरी प्रथम अर्थ संपादन केला पाहिजे. म्हणून हे राजा, तू आपल्या पराक्रमाने प्रथम अर्थ संपादन कर. कारण ऐश्वर्यरूपी अभ्युदय हाच धर्म होय असे ज्ञानी लोकांनी सांगितले आहे.' -(वन अ. ३३).
 दुसऱ्या एका प्रसंगी अर्जुनाने अर्थाच्या महत्त्वासंबंधी पुढीलप्रमाणे आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. 'हे राजा, ही पृथ्वी म्हणजे कर्मभूमी आहे. म्हणून या ठिकाणी कृषी वाणिज्य व गोरक्षण आणि नानाप्रकारची कलाकौशल्ये हीच प्रशस्त होत. या सर्व गोष्टी म्हणजे अर्थच होत. या अर्थावाचून धर्माचे किंव