पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

कामाचे अस्तित्वच राहणार नाही अशी श्रुती आहे. (निवृत्तेर्थे न वर्तेते धर्मकामाविति श्रुतिः । -शांति. १६७। १२) अर्थप्राप्ती झाली असता हे दोन्ही पुरुषार्थ संपादन करता येतात. धर्म व काम यांच्यासाठी जो अर्थाचा विनियोग करतो तो पुरुष श्रेष्ठ होय. हे राजा, जटा व कृष्णाजिने धारण करणारे, किंवा शिरोमुंडन केलेले यती, नैष्ठिक ब्रह्मचारी, विद्वान इ. प्रकारचे लोक अर्थाचाच अभिलाष करितात. तेव्हा अर्थशास्त्राच्या श्रेष्ठत्वाचे ज्ञान होणे हाच खरा प्रकाश असून ते न होणे हाच अंधकार होय. हे ज्ञानसंपन्न श्रेष्ठा, जो पुरुष आपल्या सेवकांना ऐश्वर्यसंपन्न करून शत्रूंना दंड करतो तोच खरा अर्थवान होय असे माझे मत आहे.'
 महाभारतातील कर्त्या पुरुषांना अर्थाची महती किती वाटत होती हे वरील विवेचनावरून कळून येईल. धर्माची महती त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेली आहेच. धर्म हेच पुरुषाचे साध्य होय. धर्मावाचून मनुष्य पशूसारखा होईल असे अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे व ते योग्यच आहे. कर्तव्यनिष्ठा, ध्येयनिष्ठा यांचे महत्त्व कधीच कोणी कमी करू शकणार नाही. पण त्याबरोबरच तो श्रेष्ठ धर्म साध्य होण्यासाठी अर्थ हे अत्यंत प्रभावी साधन असून त्यावाचून धर्मनिष्ठा ही टिकू शकत नाही म्हणून अर्थाकडे केव्हाही दुर्लक्ष करू नये असे भारतीय तत्त्ववेत्त्याचे सांगणे आहे.

दारिद्र्य हे पातक होय

 धर्मनिष्ठेच्या भरात अनेक वेळा धनाची निंदा व दारिद्र्याची स्तुती केली जाते. भावनेच्या भरात काही विशेष उद्देशाने तसे करणे केव्हा केव्हा युक्त ठरते. पण ते परमार्थाने घेणे हा अविचार आहे. आणि हा अविचार आपल्या देशात पुढे पुढे फार प्रबळ