पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
११७
 

झाल्यामुळे लोक ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाले. वास्तविक पाहता दारिद्र्याची स्तुती कधीही कोणी करू नये असे भारतकारांनी बजाविले आहे. ते म्हणतात-

अभिशस्तं प्रपश्यन्ति दरिद्रं पार्श्वतः स्थितम् ।
दरिद्रं पातकं लोके न तत् शंसितुमर्हति ॥

--शांति

 दरिद्री मनुष्य जवळ उभा राहिला असता एखाद्या पातकी मनुष्याप्रमाणे लोक त्याच्याकडे पाहतात. या लोकात दारिद्र्य हे एक पातकच आहे ! म्हणून त्याची प्रशंसा करणे योग्य नाही.

क्षात्रतेज

 धन हे जसे राष्ट्राचे बल आहे, त्यावर जसे राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे त्याचप्रमाणे प्रखर असे जे क्षात्रतेज त्यावरही ते अवलंबून आहे. तेही राष्ट्राचे बल आहे किंबहुना तेच प्रधानबल होय असे महाभारतकारांचे मत आहे. पण अनेक मानवांत स्वार्थ प्रबल असतो आणि त्यांच्या अंगच्या क्षात्रतेजालाही जागृती आणण्यास व ते कायमचे टिकविण्यास ऐश्वर्याचे विलोभन अवश्य असते म्हणून धनाची महती गावी लागते. सारासार विचार केला तर ही दोन्ही बले परस्परावलंबी आहेत असे दिसते. धन, ऐश्वर्य यांच्या प्राप्तीमुळे व त्याच्या रक्षणासाठी, माणूस आपले क्षात्रतेज प्रगट करतो, त्याचप्रमाणे पुष्कळ वेळा क्षात्रतेजाने माणूस लक्ष्मीला वश करून घेतो. पण एवढे खरे की धन असूनही क्षात्रतेज नसेल तर सर्व व्यर्थ होते. त्यामुळेच क्षात्रतेजाची भारतीय तत्त्ववेत्त्यांनी फार महती गाइली आहे आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही वगैरे सिद्धान्त बाजूला ठेवून रणात छातीवर वार घेत मृत्यू