पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

पावणाऱ्या वीराला योगयुक्त संन्याशाचीच गती मिळते असे सांगितले आहे.
 वनवास संपवून पांडव परत आले तरीही दुर्योधन त्यांना त्यांचे राज्य देईना. तेव्हा युद्ध हे टळत नाही असे युधिष्ठिरालाही दिसू लागले. तरी पण धर्माधर्माच्या अनिश्चयामुळे त्याचे मन शंकाकुल होतच होते. 'आम्हांला पाच गावे दिलीस तरी आम्ही संतुष्ट आहो, मग आम्ही राज्य मागणार नाही.' असा त्याने दुर्योधनाला निरोप पाठविला. आणि 'क्षत्रियधर्म म्हणजे मूर्तिमंत पापच आहे, युद्ध हे एकंदरीत वाईटच, जय मिळाला तरी, शत्रूला मारला, ही गोष्ट मनाला खातच राहाते, शत्रूच्या पाया पडून आपला राज्यभाग मागून घेण्याने जर युद्ध टळत असेल, शांती मिळत असेल, तर तेच श्रेयस्कर' वगैरे तत्त्वज्ञान तो सांगू लागला. त्या वेळी त्याची ती युद्धविन्मुखता नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णांनी पुढील स्फूर्तिदायक भाषण केले. ते म्हणाले, 'हे राजा क्षत्रियाने रणांगणांत उभे राहावे हाच त्याचा शाश्वतधर्म होय. युद्धात जय झाला किंवा न झाला तरी त्याने युद्धच केले पाहिजे. दीनासारखी याचना करणे हा क्षत्रियाचा धर्म नाही. हे महाबाहो, तू पराक्रमी असून असा दीन का होतोस ? ऊठ, तरवार गाजव आणि वाटेल तर सर्वच राज्य घे. तुझी समेटाची आशा व्यर्थ आहे. दयेस्तव, दैन्यास्तव किंवा धर्मार्थास्तव तुझी इच्छा कौरव पूर्ण करणार नाहीत. अशांची तू कीव काय करीत बसला आहेस ? अरे, वाटेल त्याने खेटर चढवावे अशा लायकीचे ते लोक आहेत आणि 'त्यांना मी कसा मारू' हा मंत्र तू घोकीत बसला आहेस. ऊठ आणि त्यांना ठेचून टाक. हत्यार उचलण्यास तुला नवे निमित्त नको आहे. जुनी पुष्कळ आहेत.' -(उद्योग अ. ७३).