पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

प्रमाणे तिच्या डोळ्यांतील कढत अश्रू तिच्या परस्पर संलग्न पुष्ट स्तनांवर अविरत पडू लागले व शोकाने व संतापाने तिच्या काळजाचे पाणी होऊन तेच नेत्रावाटे लोटत आहे की काय असा भास होऊ लागला. -(उद्योग ८२).
 शिष्टाई संपवून हस्तिनापुराहून श्रीकृष्ण परत फिरले त्या वेळी कुंतीने आपल्या पुत्रांना पुढीलप्रमाणे निरोप पाठविला. 'केशवा, त्या धर्मवेड्या युधिष्ठिराला सांग की, अर्थज्ञानरहित वेदाची केवळ घोकंपट्टी करणाऱ्या ब्राह्मणाची बुद्धी जशी मद्दड होऊन जाते व तो जशी वेदाची नुसती वटवट करीत बसतो त्याप्रमाणेच तू धर्म, धर्म करीत बसला आहेस. तुझी बुद्धी मंद झाली आहे आणि तू एक गौबाई झाला आहेस. अरे, हा कसला धर्मसंचय? असले धर्माचे खूळ घेऊन बसू नको. धर्माच्या भ्रमाखाली भलते काही तरी करू नको. शत्रुमर्दन करणे व प्रजेचे पालन करणे हा क्षत्रियाचा धर्म होय. युधिष्ठिरा, सांप्रत तू जी वृत्ती धरिली आहेस ती धारण करण्यासाठी मी तुला जन्म दिला नव्हता. तुझ्या या शत्रुहिततत्परतेमुळे पुत्रवती होऊनही मला घासभर अन्नासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहावे लागत आहे. मला कोणीच वाली उरला नाही.'
 पण या सर्वांपेक्षा क्षात्रधर्माचा खरा तेजस्वी संदेश महाभारतातील विदुला-पुत्रसंवाद या प्रकरणात आहे. संजय नावाचा राजपुत्र सिंधुदेशच्या राजाकडून पराभूत झाल्यामुळे दीन व निराश होऊन हातपाय गाळून बसला होता. राज्य परत मिळविण्याचा उद्योग करावा असे त्याच्या मनातच येईना. त्या विचाराने त्याला कापरेच भरे. त्याची आई विदुलाराणी ही अत्यंत मानी व क्षात्रधर्माभिमानी असल्यामुळे पुत्राचा हा मुर्दाडपणा तिला सहन होईना. असा पुत्र असण्यापेक्षा निसंतान झालेले पत्करेल असे तिला वाटे