पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१२१
 

व त्यामुळे अगदी संतापून पण पुत्रासाठी तळमळून, जिवाची काहिली होत असताना तिने त्याला उपदेश केला आहे. विदुलेचा हा क्षात्रधर्माचा संदेश इतका प्रखर, इतका तेजस्वी व इतका हृदयभेदक आहे, स्वाभिमान, आवेश, चैतन्य यांनी तो इतका रसरसलेला आहे की, तो वाचीत असताना क्षात्रधर्माची अग्निमय मूर्तीच आपल्यापुढे उभी आहे की काय असा भास होतो. असा संदेश ज्या देशातील माता आपल्या पुत्रांना देतात त्या देशातच धैर्यशील, अजिंक्य, अपराजित व अमोघप्रराक्रमी असे पुरुष निर्माण होतात.
 युधिष्ठिराचा दळेपणा नष्ट होऊन क्षत्रियाला शोभेसा पराक्रम करण्यास तो उद्युक्त व्हावा म्हणून कुंतीने मुद्दाम त्याला हा विदुलेचा उपदेश ऐकविला होता.

उद्योग-प्रयत्नवाद

 धन आणि क्षात्रतेज यांच्याप्रमाणेच उद्योग हे प्रवृत्तिधर्माचे तिसरे साधन आहे. पौर्वात्य लोक आणि विशेषतः भारतातील लोक हे दैववादी झालेले होते व अजूनही बव्हंशी तसेच आहेत हे खरे. पण भारतीय तत्त्वज्ञानाचा जो राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे महाभारत त्यात तर ठायी ठायी प्रयत्नवादाचा इतका पुरस्कार केलेला आढळतो की हे लोक दैववादी का व्हावे हे कळेनासे होते. दैवच श्रेष्ठ आहे या अर्थाची काही वचने महाभारतात आहेत, नाही असे नाही. पण तशी कोणत्याही ग्रंथात सापडतील. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय संसारात तशा मताची काही माणसे असणारच. पण या संसारातले श्रीकृष्ण, भीष्म, भीम, अर्जुन यांसारखे जे कर्ते पुरुष ते तर सदैव उद्योगाचीच प्रशंसा करताना आढळतात