पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

आणि तरी भारतीय लोक दैववादी झाले हे पाहिले म्हणजे पुढच्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा येथल्या लोकांना विसर पडून प्रयत्नवादाला अत्यंत मारक असे कलियुगाचे व निवृत्तीचे तत्त्वज्ञान त्यांनी स्वीकारले असले पाहिजे यात शंका राहात नाही.
 पण त्याबरोबरच या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करताच पुन्हा कृतयुग सुरू होईल असा पूर्ण आत्मविश्वास वाटत असल्यामुळे या थोर पुरुषांची अमृतवचने येथे द्यावी असे ठरविले आहे.
 विदुलेने आपल्या पुत्राला जो उपदेश केला त्याचा उल्लेख वर आलाच आहे. त्यात पुरुषप्रयत्नाचे तिने केलेले विवेचन अत्यंत मार्मिक आहे. आपल्या घरातील पुरुष- पती, पुत्र, बंधू -उद्योग सोडून स्वस्थ बसले म्हणजे स्त्रियांच्या चित्ताचा किती जळफळाट होत असेल ते त्यावरून चांगले व्यक्त होते. धर्मराज अरण्यात दुर्योधनाच्या प्रतिकाराचा विचार न करताच स्वस्थ बसलेले पाहून द्रौपदीलाही असाच उद्वेग वाटला व तिने त्यांना उद्देशून पुढीलप्रमाणे भाषण केले :
 ती म्हणाली, 'राजा, आज आपल्यावर मोठा अनर्थ ओढवला आहे. पण तुम्ही जर प्रयत्न केला तर तो टळेल यात शंकाच नाही. प्रयत्न केल्यानंतरही जर फलप्राती झाली नाही तर पांडवांच्या हातून कार्यसिद्धी होत नाही, असे तरी एकदा ठरेल. दुसऱ्याच्या, अर्थात शत्रूंच्या प्रयत्नास फल येते का आपले प्रयत्न यशस्वी होतात हे प्रयत्न केल्यानंतर जे फल येईल त्यावरूनच कळेल. तो केल्यावाचून कसे कळणार? 'दुसऱ्या पुरुषाने जे जे केले असते ते सर्व मी केले आहे, असे असताही जर त्याचे फल मला मिळाले नाही तर त्याचा दोष माझ्याकडे नाही.' असे समाधान धैर्यसंपन्न पुरुषाने मिळविले पाहिजे. प्रयत्न करूनही जर फल