पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

यानंतरच्या काळात भरतखंडातील भिन्न प्रांतांत अनेक थोर पुरुष होऊन गेले. त्यांनी पराक्रमही केले आणि त्यांतील तत्त्ववेत्त्यांनी थोर असे ग्रंथही लिहिले, पण अखिल भारतीय अधिराज्य त्यांतील कोणालाच प्राप्त झाले नाही. म्हणूनच राष्ट्रीय दृष्टीने विचार करता भारतीयांनी महाभारताचे महत्त्व फारच मानले पाहिजे. माणूस त्रिचनापल्लीचा असो, काश्मीरचा असो, सिंधमधील असो की आसाममधील असो, तेलगू, तामीळ ही त्याची मातृभाषा असो की हिंदी किंवा बंगाली असो, त्याला महाभारताबद्दल सारखाच जिव्हाळा वाटतो. हे भिन्न प्रांतीय व भिन्नभाषी लोक एकत्र आले तर त्यांना सर्वांना एकजीव करणारा पुरुष म्हणजे श्रीकृष्ण हाच आहे आणि त्यांचे भीम, अर्जुन, अभिमन्यू हेच शौर्याचे आदर्श आहेत. या व्यक्तींच्या स्मृति अजूनही इतक्या उज्ज्वल व प्रभावी आहेत की, यांच्या स्मरणाने आजही अगदी दूरच्या प्रांतातील भारतीयांना एकमेकांच्याजवळ आल्यासारखे वाटते.
 असा हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे एक काल्पनिक कथांचे भारूड नसून एक जिवंत इतिहासग्रंथ आहे ही विशेष भाग्याची गोष्ट आहे. महाभारतात अनेक अद्भुत, अमानुष, दैवी अशा घटना वर्णिलेल्या आहेत. आणि त्या वातावरणात इतरही कथा सापडून दूषित झाल्या आहेत. पण या कथा वगळल्या, व इतर कथांवर आलेले पटल दूर करून आपण जाणत्या दृष्टीने न्याहाळून पाहू लागलो की कठोर तर्कदृष्टीला पटणारा, वाटेल त्या कसोठीला उतरणारा, प्रमाणांनी सिद्ध होणारा असा शुद्ध इतिहास आपल्या हाती लागतो.
 पुष्कळ वेळा राष्ट्रामध्ये सद्गुणसंवर्धन व्हावे म्हणून तेथील तत्त्ववेत्ते अनेक प्रकारच्या काल्पनिक कथा रचून त्यांचा प्रसार