पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१२३
 

मिळाले नाही तर मग खेद वाटणार नाही. कारण कार्यसिद्धीला प्रयत्नाप्रमाणेच इतरही कारणे असतात. प्रयत्न केला म्हणजे सिद्धी होईल किंवा एखादे वेळी न होईल. पण प्रयत्नाकडे प्रवृत्तीच नसणे हे अगदी अश्लाघ्य आहे. प्रयत्नच केला नाही तर सिद्धी मिळणार की नाही हे कळण्यास मार्ग नाही.
 प्रयत्न केला तरीही एखादे वेळी कार्यसिद्धी होत नाही याचे कारण असे की कार्यसिद्धीला इतर पुष्कळ गोष्टी जुळून याव्या लागतात. त्या जुळून आल्या नाही तर फल कमी मिळते किंवा एखादे वेळी मुळीच मिळत नाही. पण तेवढ्यामुळे उद्योगच करू नये हे म्हणणे चुकीचे आहे. कारण कार्याविषयी उद्योगच केला नाही तर सिद्धिरूपी फल निश्चितच मिळणार नाही हे एक आणि दुसरे म्हणजे आपल्या अंगी असणारे शौर्यादि गुण कळूनच येणार नाहीत. देश, काल इत्यादी कार्यसिद्धीची अंगे आहेत हे खरे आणि म्हणूनच सुज्ञ मनुष्य आपला उत्साह आणि सामर्थ्य यांच्या बरोबरच देश, काल, सामादिक उपाय व आपले कल्याण यांचा विचार आपल्या बुद्धीने करीत असतात. पण देश, काल व हे उपाय यांनी कार्यसिद्धी होईलच असे नाही. पराक्रम हाच काय तो कार्यसिद्धी कशी होते हे ठरवितो. यश हे मुख्यत्वेकरून पराक्रमावरच अवलंबून आहे. युधिष्ठिरा, शत्रूचा पराजय करण्याची संधी आलेली दिसताच त्याविषयी उद्योग करू लागणारा मनुष्य, उद्योग जरी सफल झाला नाही, तरी कर्तव्य बजवल्यामुळे आपल्या व दुसऱ्याच्या ऋणातून मुक्त होतो. राजा, काल व स्थिती यांच्या मानाने प्रयत्न करणे हेच सिद्धीचे मूळ कारण आहे. हे भरत- कुलश्रेष्ठा, पूर्वी माझ्या पित्याने एक पंडित ब्राह्मण घरी ठेवून घेतला होता. त्याने ही बृहस्पतिप्रोक्त नीती माझ्या पित्याला सांगितली व