पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

बंधूंना शिकविली. त्या वेळी त्यांच्याकडून मी ती घरामध्ये ऐकिली होती. -(वन. अ. ३२).

पुरुषप्रयत्न

 श्रीकृष्ण शिष्टाईला जाण्यापूर्वी त्यांचे व भीमसेनाचे बरेच बोलणे झाले. त्या वेळी त्यांनी दैव व पुरुषप्रयत्न याविषयी जे विवेचन केले आहे ते अत्यंत शास्त्रीय व सारगर्भ असे असून श्रीकृष्णाच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अत्यंत रेखीव असे आहे. ते म्हणाले, 'वृकोदरा, या लोकात दैव आणि पुरुषप्रयत्न यांपैकी कोण बलवान हा निर्णय समजावा अशी सर्वांना जिज्ञासा असल्यामुळे त्याचा निर्णय करण्याविषयी पुष्कळ पंडित प्रयत्न करीत असतात. पण तो विषयच असा संशयात्मक आहे की त्याचा निभ्रांत व समाधानकारक उलगडा कोणाच्याने करवत नाही. कारण, जगात पहावे तो जी कृती एक वेळ पुरुषाच्या कार्यसिद्धीला कारण होते तीच दुसरे वेळी कार्यहानीला कारण होते. एवंच, पुरुषयत्न सफल होतोच असे म्हणण्याला संदेह आड येतो. बरे, कोणत्याही गोष्टीतील दोष पूर्वी जाणणारे लोक, असे असे होईल, म्हणून भाकित करून ठेवितात आणि पुढे पहावे तो वायूच्या गतीप्रमाणे ती गोष्ट भलत्याच दिशेला जाते. मोठ्या विचाराने व न्यायाने एखादे कर्म पुरुषाने आरंभून ते मोठ्या काळजीने चालविले असताही दैवांच्या फटकाऱ्याने पालथे पडते. बरे, त्याचे उलट सहजसिद्ध दैवकृत कर्माचा पुरुषप्रयत्नानेही प्रतिकार घडतो. म्हणजे दैव किंवा संचित यांचाही जोर पुरुषप्रयत्नापुढे सदा चालतोच असे नाही. शिवाय, हे पंडुनंदना, पुरुषप्रयत्न सोडून नुसत्या दैवाच्या हवाल्यावर बसल्याने मनुष्याचा उदरनिर्वाहही होणार नाही. तेव्हा