पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

अत्यंत अवश्य आहे, संन्यासप्रवृत्ती ही याला निश्चित मारक होईल हे न सांगताही कळण्याजोगे आहे. महाभारतात चारही आश्रमांचे वर्णन आलेले आहे. संन्यासधर्माचे महत्त्वही काही ठिकाणी सांगितलेले आहे. पण गृहस्थधर्माची अतिशय महती गाऊन तो आश्रम सर्वश्रेष्ठ होय असे जे अत्यंत आग्रहाने अनेक ठिकाणी सांगितले आहे त्याचे कारण हेच होय. कारण गृहस्थाश्रमावाचून प्रवृत्तीधर्माला अर्थच नाही.
 पराशर मुनींनी मोक्षधर्मप्रकरणीसुद्धा गृहस्थाश्रमाचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

यथानदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम्
एवमाश्रमिणः सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम्

—(शांति २९५/३९).

 'ज्याप्रमाणे सर्व नद्या व मोठाले नद हे सागराच्या आश्रयाने राहतात त्याचप्रमाणे इतर आश्रमातील लोक गृहस्थाश्रमी पुरुषावर अवलंबून असतात.'
 याचप्रमाणे वेदव्यासांनीही आपले मत दिले आहे.

गृहस्थस्त्वेष धर्माणां सर्वेषां मूलमुच्यते ।

-(शां. २३४।६).

 गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्मांचा आधार आहे असे ते म्हणतात. युधिष्ठिराला उपदेश करतानाही व्यासांनी हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'गृहस्थाश्रमी मनुष्याच्याच आधाराने देव, पितर, अतिथी आणि पोष्यवर्ग आपली उपजीविका चालवीत असतात. यास्तव हे पृथ्वीपते तू त्यांचे पोषण कर. हे प्रजाधिपते पक्षी, पशू आणि इतरही सर्व प्राणी यांचे पोषण गृहस्थाश्रमी करीत असतो. म्हणूनच गृहस्थाश्रमी श्रेष्ठ होय.