पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१२७
 

गृहस्थाश्रम हा चारही आश्रमांमध्ये आचरण्यास कठीण आहे. यास्तव दुर्बलांना दुःसाध्य अशा या गृहस्थाश्रमाचा तू अंगीकार कर."
 गृहस्थाश्रमाची ही महती सर्वांनाच मान्य आहे. निवृत्तिवादी लोकसुद्धा याला विरोध करू शकत नाहीत. पण त्यांचे म्हणणे असे असते की, इहलोकीचे सर्व व्यवहार व्यवस्थित चालून समाज सुस्थितीत राहावा, तो ऐश्वर्यसंपन्न व्हावा यासाठी गृहस्थाश्रम हा अवश्य हे खरे. पण ही कर्तव्ये मनुष्याने पार पाडल्यानंतर मोक्षासाठी त्याने संन्यास घेणेच अवश्य आहे. महाभारतात काही मुनींनी या तऱ्हेचे मतही दिलेले आहे. पण ते काही मुख्य भारतीय तत्त्वज्ञान नव्हे. श्रीकृष्ण, व्यास, भीष्म हे थोर भारतीय पुरुष याचा पुरस्कार करीत नाहीत. श्रीकृष्णांनी तर मोक्षासाठी संन्यासधर्माची मुळीच जरूर नाही असे स्पष्ट मत दिले आहे. भगवद्गीतेचा मथितार्थ असाच आहे हे गीतारहस्यात स्पष्ट झालेलेच आहे, पण त्याशिवाय अन्य ठिकाणीही श्रीकृष्णांनी आपले हे मत निःसंदिग्धपणे मांडलेले आढळते.
 ते म्हणतात, 'कोणाचा द्रोह न करिता पवित्र राहून शुद्ध अशा स्थली वेदाध्ययन करीत कुटुंबातच राहावे' अशी या कामी शास्त्राज्ञा स्पष्ट आहे. तरी ज्ञानी ब्राह्मणांतही याविषयी निरनिराळी मते रूढ आहेत. कोणी म्हणतात कर्मानेच परलोकप्राप्ती होते, कोणी म्हणतात कर्मत्यागपूर्वक ज्ञानानेच होते. असे आहे तरी ही गोष्ट कोणालाही कबूल करणे भागच आहे की, विद्वान झाला तरी भक्ष्यभोज्य पदार्थ खाल्ल्यावाचून त्याची काही तृप्ती होत नाही. आणि ब्रह्मवेत्ते संन्यासी झाले तरी त्यांना गृहस्थाकडे भोजन शास्त्रानेच विहित आहे. तेव्हा कर्म आणि संन्यास हे दोन्ही जरी