पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

विहित असले तरी कर्माधार जो गृहस्थाश्रम तोच संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण संन्यासादि अन्य आश्रमात साधणारे जे ज्ञान ते गृहस्थाश्रमातही साध्य होते हे जनकादिकांच्या उदाहरणारून स्पष्ट होते. परंतु गृहस्थाश्रमात साधणाऱ्या स्वतःचे, पितरांचे व अतिथींचे पोषण या गोष्टी संन्यास, ब्रह्मचर्य या आश्रमांत साध्य होत नाहीत. अतएव कर्म व ज्ञान या उभयतांचा साधक जो गृहस्थाश्रम तोच श्रेष्ठ आहे हे सिद्ध आहे.' -(उद्योग २९).

प्रजापालन हाच मोक्ष

 गृहस्थाश्रम हाच सर्व आश्रमात श्रेष्ठ असून मोक्षासाठीही संन्यासधर्माची जरूर नाही असे वरीलप्रमाणेच इतर ठिकाणीही बरेच वेळा सांगण्यात आलेले आहे. भीष्म युधिष्ठिराला सांगतात, 'हे राजा सर्व आश्रमांमध्ये गृहस्थाश्रमाचेच धर्मसिद्धत्व अत्यंत उज्ज्चल असून तो अत्यंत पवित्र आहे असे म्हटलेले आहे. आम्हीही त्याच धर्माचे सेवन करीत आहो. हे नरश्रेष्ठा अंतःकरणाचा निरोध करून अत्यंत प्रसन्नचित्ताने जो राजा प्रजापालनामध्ये मग्न होऊन राहतो त्याला वेदाध्ययननिष्ठ व सत्कर्म करणारे असे जे ब्राह्मण त्यांच्या धर्माची प्राप्ती होते. सर्व प्राण्यांचे पालन व स्वराष्ट्ररक्षण यांच्या योगाने राजाला संन्यासाश्रमाच्या फलाची प्राप्ती होते. प्राणांचे केवल द्यूतच असा जो संग्राम त्यामध्ये एक स्वतःचे रक्षण किंवा मृत्यू या दोनच गोष्टी घडावयाच्या असा ज्या राजाचा निश्चय असतो त्याला संन्यासाश्रमाचे फल मिळते. -(शांति ६६) संग्राम हाच क्षत्रियांचा धर्म होय. शत्रुनाशावांचून श्रेष्ठ असे दुसरे त्याचे कोणतेही कर्तव्य नाही. दान, अध्ययन आणि यज्ञ हे क्षत्रियांनी संपादन केलेल्या संपत्तीच्या रक्षणाचे उपाय आहेत.