पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

राहिलेले चालेल असेही व्यास सांगत आहेत. पितामह भीष्मांनी एके ठिकाणी हेच सांगितले आहे. ब्राह्मणाने संन्यासाश्रमात कसे वागावे हे सांगितल्यानंतर ते म्हणाले, 'तसेच, वेदांचे अध्ययन केल्यानंतर जो ब्राह्मण ऋषींच्या धर्माने युक्त असणाऱ्या गृहस्थाश्रमरूपी कठीण धर्माचे एकाग्र अंतःकरणाने आचरण करतो त्यालाही त्या आश्रमास विहित असलेली कृत्ये करून व प्रजा निर्माण करूनं सुखोपभोग घेतल्यानंतर ब्रह्मपदाची प्राप्ती होते.' -(शांति अ. ६१). त्याच ओघात पुढे बोलताना भीष्म म्हणाले, 'याप्रमाणे जो यज्ञशील ब्राह्मण यथाविधी गृहस्थाश्रमाचा अंगीकार करून राहतो व गृहस्थाश्रमास योग्य व अत्यंत पवित्र अशीच उपजीविका संपादन करतो त्याला स्वर्गलोकी अत्यंत पवित्र अशा फलाची प्राप्ती होते. त्याने ज्या इच्छा मनात धरलेल्या असतात त्यांचा नाश होत नाही व म्हणूनच देहत्यागानंतर त्या सर्व ठिकाणी नेत्र, शरीर व मुख यांनी युक्त असणारे असे स्वरूप धारण करून अनंततत्व प्राप्तीच्या इच्छेने त्याच्याकडे येतात. अर्थातच मोक्षाची इच्छा असल्यास तो मुक्तही होतो.'-(शां. ६१).
 मोक्ष हे जरी प्रत्येकाचे अंतिम साध्य आहे तरी त्यासाठी संन्यास अवश्यच आहे असे नाही. आमरण गृहस्थाश्रमात राहूनही मोक्षप्राप्ती करून घेता येते असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत होते, असे वरील वचनांवरून स्पष्ट दिसून येते.
 यानंतर, काही ठिकाणी संन्यासाचेही गुणवर्णन केलेले आढळते, तेही आपण तपासून पाहिले पाहिजे. ते पाहता पहिली गोष्ट अशी दिसून येते की, संन्यास हा विहित आहे असे काही ठिकाणी जे सांगितलेले आहे ते फक्त ब्राह्मणांपुरते आहे. इतर वर्णीयांना संन्यासाची अनुज्ञा अगदी क्वचितच दिलेली आढळेल.