पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१३१
 

 कौरव-पांडवांचे युद्ध झाल्यानंतर धर्मराजाला सर्व राज्य प्राप्त झाले होते. पण त्याचे मन एकाएकी फिरले. युद्धामध्ये आपल्या हातून फार हत्या झाली या कल्पनेने त्याला अत्यंत उद्वेग वाटू लागला. व आपण संन्यास घ्यावा असे त्यास वाटू लागले. तो म्हणाला, 'ज्या अर्थी संन्यास करणाऱ्या मनुष्यास जन्ममरणाची प्राप्ती होत नाही असे श्रुतिवाक्य आहे त्या अर्थी अंतःकरणाचा निश्चय करणारा तो संन्यासी योगमार्गाची प्राप्ती होऊन ब्रह्मस्वरूपी बनून जातो हे खास. म्हणूनच अर्जुना, आता शीतोष्णादिक द्वंद्वांचा त्याग करून ध्याननिष्ठ होऊन ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने मी तुम्हा सर्वांचा निरोप घेऊन वनात जाणार.'
 धर्मराजाचे हे बोलणे ऐकून भीम, अर्जुन, द्रौपदी यांना फार विस्मय वाटला व संतापही आला. शेवटी संन्यासच घ्यावयाचा होता तर मग हा युद्धाचा खटाटोप कशाला केला, असे ते सर्व त्याला म्हणू लागले व त्याची निर्भर्त्सना करू लागले. भीम म्हणाला, 'राजा, तुजवाचून दुसऱ्या कोणाही क्षात्रधर्माचरण करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी क्षमा, दया, ही वास करीत नाहीत. जर तुझा असा विचार आहे हे आम्हांस पूर्वीच कळले असते तर आम्ही शस्त्रग्रहणही केले नसते आणि शरीरपतन होईपर्यंत भिक्षाच मागून राहिलो असतो. राजा, 'हा ज्येष्ठ आहे' असा विचार करत आम्ही तुज मंदबुद्धीच्या अनुरोधाने वागत होतो, याबद्दल आम्हीच निंदेस पात्र आहो. हे नरश्रेष्ठा, मी सांगतो याचा आता विचार कर. अरे, वार्धक्याने जर्जर होऊन गेलेल्या अथवा शत्रूंनी पीडित करून सोडलेल्या मनुष्याने आपत्काली संन्यास घ्यावा असे शास्त्र आहे. म्हणूनच बुद्धिमान लोक या संन्यासाचे नाव सुद्धा घेत नाहीत. इतकेच नव्हे तर सूक्ष्मदृष्टी लोक क्षत्रियाने