पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

संन्यास घेणे म्हणजे धर्माचा अतिक्रम आहे असे मानतात. अरे, जर संन्यासाच्या योगाने एखाद्या राजाला सिद्धी मिळाली असती तर पर्वतांना व वृक्षांनाही सत्वर सिद्धी मिळाली असती. कारण हे देखील नेहमी संन्यासी, निरुपद्रवी व निरंतर ब्रह्मचर्याने वागणारे असेच आहेत.' -(शांति. अ. १०).
 भीमाप्रमाणेच द्रौपदीही युधिष्ठिरावर फार चिडून गेली होती. ती म्हणाली, "हे नरश्रेष्ठा, वनवासात असताना 'वनवास संपल्यावर आपण दुर्योधनाचा वध करू व पृथ्वीचा उपभोग घेऊ. असे तू म्हणाला होतास. आणि आज आता त्याच्या उलट वागून आमच्या अंतःकरणावर काय म्हणून प्रहार करीत आहेस ? हे राजा, सर्व प्राण्यांशी मित्रत्वाने वागणे, आणि दान, अध्ययन व तप करणे हा ब्राह्मणांचा धर्म असेल कदाचित्, पण तो क्षत्रियांचा धर्म नव्हे. दुष्टांना हाकून लावणे, सज्जनांचे पालन करणे व संग्रामातून पलायन न करणे हा क्षत्रियांचा धर्म होय. हे नृपश्रेष्ठा, तुझ्या ह्या वेडेपणामुळे सर्व पांडवही वेडे बनून गेले आहेत. कारण हे जर वेडे नसते तर इतर नास्तिकांसहवर्तमान त्यांनी तुला बद्ध करून स्वतःच पृथ्वीचे पालन केले असते." -(शांति, १४).
 काही वेळाने इतर ऋषींनी युधिष्ठिराला उपदेश केल्यावर अर्जुन त्याला म्हणाला, 'हे नरश्रेष्ठा, तू क्षत्रियांचा धर्म लक्षात आण. तप आणि त्याग हे ब्राह्मणांच्या परलोकप्राप्तीस कारणीभूत होणारे धर्म आहेत. क्षत्रियांचा संग्रामामध्ये मरण हाच धर्म होय. यास्तव हे भरतकुलश्रेष्ठा, सर्व धर्म जाणणारा, धर्मात्मा, बुद्धिमान, चतुर आणि लोकांमध्ये निकृष्ट कोणते व उत्कृष्ट कोणते हे अवगत असलेला अशा प्रकारचा तू राजा संतापजन्य शोक सोडून दे व स्वकर्मे करण्याविषयी उद्युक्त हो.' (शां. २२).