पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
 

करतात. सत्याने वागल्यास शेवटी सुख निश्चित मिळते, परमेश्वराची भक्ती केली तर तो भक्ताच्या कुटुंबीयांना अंतर देत नाही, परोपकार करणाराला नेहमी उत्तम लोक प्राप्त होतो, नीच वर्तन करणारास त्याचे प्रायश्चित्त मिळाल्याखेरीज रहात नाही इत्यादी तत्त्वे बहुजन समाजाला कळावी व त्याने ती आचरावी म्हणून अनेक प्रकारच्या कथा रचल्या जातात व त्यांत तशी तशी बरीवाईट फळे परमेश्वराने दिली अशी वर्णने केलेली असतात. आपल्या पुराणांतल्या अनेक कथा व संतवाङ्मयातल्या कथा याच जातीच्या आहेत. सद्गुण- संवर्धनासाठी रचलेल्या त्या काल्पनिक व अद्भुत अशा कथा आहेत. महाभारतातील कौरवपांडवांच्या, श्रीकृष्णाच्या कथाही अशा काल्पनिक कथा आहेत असे रमेशचंद्र दत्त, वेबरप्रभृती काही पंडितांचे मत आहे.
 भारतातील या कथांवर स्वप्नातही करणे अशक्य असा जर एखांदा आरोप असेल तर हा होय. नीतितत्त्वांच्या प्रसारासाठी काही तरी काल्पनिक लिहावयाचे असते तर व्यासांनी द्रौपदीला या सर्व आख्यानाची नायिका केली नसती. पाच पतींना वरणारी, भर सभेत परपुरुषाच्या स्पर्शाने दूषित होणारी अशी ही स्त्री सद्गुणसंवर्धनासाठी निर्माण केली आहे असे म्हणणे म्हणजे अर्थाचा अनर्थ करण्यासारखे आहे. द्रौपदीची भारतातील स्वभावरेखा ही एक दिव्य व अलौकिक रेखा आहे. अरण्यात पतीबरोबर कष्ट सहन करण्यात तिने दाखविलेले धैर्य, तिच्या बोलण्यातून दिसून येणारी तिची बुद्धिमत्ता व विवेचक दृष्टी, तिची पतिनिष्ठा या सर्व गुणांनी ही मानिनी कोणी शापभ्रष्ट देवता आहे असे वाटते. असे हे स्वभावचित्र जर काल्पनिक असते तर लेखकाने तिच्या अंगी वरील वैगुण्ये चिकटविली