पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१३३
 

 याप्रमाणे अर्जुनाने विनविले तरी त्या कुरुकुलोत्पन्न कुंतीपुत्र युधिष्ठिराने उत्तर दिले नाही, तेव्हा व्यासमुनी त्याला म्हणाले, 'हे सौम्या युधिष्ठिरा, अर्जुनाचे हे भाषण अगदी खरे आहे. शास्त्रामध्ये दृष्टिगोचर होणारा जो श्रेष्ठ धर्म तो गृहस्थाश्रमाचेच अवलंबन करून राहिलेला आहे. यास्तव हे धर्मज्ञा, तू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यथाविधी स्वधर्माचे आचरण कर. हे महाराजा, तप, मिक्षा, ध्यान एकांतवास हे व्यापार ब्राह्मणांनाच फलदायक होतात. क्षत्रियाचे हे व्यापार नव्हत. दण्डधारण हाच क्षत्रियाचा श्रेष्ठधर्म होय.' -(शां. २३).
 क्षत्रियाला संन्यास विहित नाही, त्याने राज्यपालनच केले पाहिजे, त्यानेच त्याला मोक्षप्राप्ती होते असे भीम, अर्जुन, द्रौपदी यांनी युधिष्ठिरास अगदी निक्षून सांगितलेले आहे व त्यावर शेवटी व्यासांनी आपल्या संमतीचा शिक्का दिलेला आहे.
 संन्यास हा भारतीय तत्त्ववेत्त्यांना कितपत इष्ट आहे हे यावरून कळून येईल. प्रथमतः मोक्षासाठी तो अवश्य नाही, गृहस्थाश्रमात राहूनही मोक्ष मिळतो असे त्यांनी सांगितले. नंतर विकल्पाने त्यांनी दिलेली सवलत हीसुद्धा फक्त ब्राह्मणांना आहे असे सांगितले. आणि यापुढे जाऊन संन्यासधर्माची ब्राह्मणांतही फाजिल प्रवृत्ती झाली तर समाज उत्सन्न होईल हे जाणून त्यांनी संन्यास हा फक्त म्हातारपणीच घ्यावा असा दण्डक घालून दिलेला आहे.
 व्यास म्हणतात, 'जेव्हा गृहस्थाश्रमी पुरुषाला, आपले शरीर वृद्धपणामुळे पांढरे होऊन सुरकुतलेले आहे असे दिसून येईल व आपल्या मुलाला मूल झाल्याचे तो अवलोकन करील तेव्हाच त्याने वनाचा आश्रय करावा.' –(शांति अ. २४४). पितामह भीष्मांनीहि हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. 'बुद्धिमान अशा