पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

गृहस्थाश्रमी ब्राह्मणाने वेदाध्ययन आणि षट्कर्माचरण ही करावी व गृहस्थाश्रमोचित सर्व कर्मे केल्यानंतर त्याने वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करणे प्रशस्त होय.' -(शां. अ. ६३).
 महाभारतात क्वचित गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम हे टाळून ब्रह्मचर्यातून एकदम संन्यासाश्रमात जावयास ब्राह्मणांना अनुज्ञा दिलेली आहे. (शांति ६१). त्याचप्रमाणे क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांनाही संन्यासाश्रमाची अनुज्ञा दिलेली आहे. (शांति ६३) पण एकंदर विवेचनाचा ओघ पाहिला तर पुढीलप्रमाणे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत आहे असे स्वच्छ दिसून येते.
 गृहस्थाश्रम व संन्यास हे दोन्ही आश्रम मोक्षप्राप्तीस सारखेच योग्य आहेत. संन्यास अवश्य आहे असे मुळीच नाही. उलट गृहस्थाश्रमात राहिल्याने राष्ट्राची सेवा करता येते व त्यामुळे समाजाचे हित होते. म्हणून केवळ मोक्ष देण्यास तो समर्थ आहे म्हणून संन्यासाकडे कोणाचीच प्रवृत्ति नसलेली बरी. त्यातूनही संन्यास अवश्य वाटलाच तर ब्राह्मणांनी फक्त त्याचा स्वीकार करावा. पण तोही प्रपंचाची सर्व कार्ये यथासांग झाल्यावर, गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्ये पार पाडल्यावर, वृद्धापकाळी करावा हेच युक्त आहे. आणि संन्यासासंबंधी हे धोरण ठेवले तरच राष्ट्राचा उत्कर्ष होईल. परिपक्क बुद्धीच्या कर्तृत्वशील अशा पुरुषांपैकी जर संन्यासाकडे प्रवृत्ती होऊ लागली तर राष्ट्राचा नाश होईल.
 महाभारताला राष्ट्रीय ग्रंथ का म्हणतात ते वरील विवेचनावरून ध्यानात येईल. राष्ट्राचा उत्कर्ष हाच मुख्य धर्म होय, असे त्यात मोठ्या आग्रहाने प्रतिपादन केलेले आहे. धन, बल, क्षात्रधर्म, संसारप्रेम यांवाचून राष्ट्र जगणे अशक्य आहे हे जाणून या तत्त्ववेत्त्यांनी त्यांचा पुरस्कार करून त्यांचे महत्त्व काय ते मोठ्या