पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

विषहृते यस्मात् तस्मात् पुरुष उच्यते' ॥(५|१३३|३५) शत्रूचा प्रतिकार करतो म्हणून पुरुष ग्हणतात; 'न निर्मन्युः क्षत्रियोऽस्ति । लोके निर्वचनं स्मृतम्' -'ज्याला अपमानाची चीड नाही तो क्षत्रियच नव्हे.' (वन, २७, ३७) ; नामर्षं कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः ॥ (२,५०,१७); ज्या पुरुषाला (दुसऱ्याने अपमान केला तरी) क्रोध येत नाही, तो अधम समजावा; संतोषो वै श्रियं हन्ति (२, ४९, १४) असंतोषः श्रियो मूलम् ॥ असंतोष असेल तर वैभव प्राप्त होते, संतोषामुळे त्याचा नाश होतो. -(सभा ५५/११).
 अशा तऱ्हेची जयिष्णू वृत्तीला प्रोत्साहक अशी शेकडो सुभाषिते महाभारतात विखुरलेली आहेत. सावधनाता, दक्षता, साहसी वृत्ती यांचीही महाभारतांत प्रशंसा अनेक ठिकाणी केली आहे.

न हि प्रमादात्, परमस्ति कश्चित् वधो नराणांमिह जीव लोके
प्रमत्तमर्था हि नरं समन्तात् त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति ।

- १०, १०, १९

 या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा अधिक घातक असे काहीच नाही. बेसावध राहणाऱ्या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ती सोडून जाते, आणि त्याच्यावर संकटे मात्र कोसळतात.
 भोळ्या भावाला, देवावर भार घालून स्वस्थ बसण्याला भक्तिमार्गात कितीही किंमत असली तरी संसारात त्याला मुळीच किंमत नाही, इतकेंच नव्हे तर तो घातुक ठरतो असे येथे सांगितले आहे. माणसांच्या नेहमी चुका होतात त्या याच एका प्रांतात सांगितलेले वचन ते दुसऱ्या प्रांतात आणून सर्वनाश करून घेतात.