पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

नसती. पण त्यांचाही त्याने उल्लेख केला आहे यावरूनच ही कृती काल्पनिक नसून ऐतिहासिक आहे या म्हणण्यात शंका राहात नाही. सद्गुणांच्या गोष्टींत मध्यंतरी संकटे आली तरी शेवटी सर्व गोड झाले असे दाखविणे अवश्य असते. एरवी माणसे कोणत्या विलोभनाने सद्गुणांचे आचरण करणार? पण येथे काय प्रकार आहे ? या स्त्रीला अंती फल काय मिळाले ? तिचे पाचही पुत्र शत्रूने चिरून टाकले, भावाला यज्ञीय पशूसारखा बुकलून ठार मारला आणि पुढे सगळा निर्वंश होण्याची पाळी आली.
 नीतिबोधांच्या चौकटीत स्वतः श्रीकृष्णाचे चरित्रसुद्धा बसणार नाही. या वीराने कंसाचा वध केला येथवर ठीक आहे. पण पुढे त्यानेच आपली फजिती कशी झाली त्याचे जे वर्णन केलेले आहे ते त्याच्या देवपणाशी अगदीच विसंगत आहे. जरासंधाच्या पराक्रमाचे धर्मराजाजवळ वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणाला, 'युधिष्ठिरा, जरासंधाने भोजकुलातील सर्व क्षत्रियांची राज्यलक्ष्मी हरण केलेली आम्ही पाहिली. आणि त्याच्या भयाने आम्ही मथुरा देश सोडला व द्वारकेस पळून गेलो. आमची एकंदर अठरा राजकुले होती. पण आमच्या असे ध्यानात आले की, आम्ही सर्व आपल्या सर्व सामर्थ्यानिशी जरासंधाशी तीनशे वर्षे जरी झुंजलो तरी त्याचा पराभव होणार नाही. तेव्हा घाबरून जाऊन आम्ही पश्चिमेस पळून गेलो व द्वारका नगरी बसविली. तेथे भक्कम दुर्ग बांधले व पुत्रकलत्रासह तेथे राहिलो, तेव्हा आम्ही निर्भय झालो.'
 कल्पनेने निर्माण केलेल्या अद्भुत दैवी पुरुषाला हे बोलणे कसे शोभेल ! श्रीकृष्णाचा अंतही सद्गुणांच्या फळाला शोभेसा झाला