पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
 

नाही. शेवटी यादववीर त्याच्या आज्ञेत राहीनासे झाले, खुद्द त्याचा पुत्र प्रद्युम्न व सेनापती सात्यकी हे मद्य पिऊन उन्मत्त झाले, म्हणून श्रीकृष्ण अरण्यात निघून गेला. तेथे एका व्याधाच्या बाणाने त्याला मृत्यू आला. त्यानंतर त्याच्या स्त्रियांची फारच विटंबना झाली. अर्जुन त्यांना घेऊन हस्तिनापुरास जात असताना त्या स्त्रियांना रानटी लोकांनी पळवून नेले व काही स्त्रिया स्वखुषीने त्यांच्याबरोबर गेल्या. अर्जुन एवढा पराक्रमी पण त्याचे काही चालले नाही. हा हृदयद्रावक शेवट कोणचा नीतिबोध करण्यास समर्थ आहे. या घटना म्हणजे कठोर सत्ये आहेत. भूतार्थ आहेत. मृत्युलोकीची जाणीव करून देणाऱ्या त्या इंगळ्या आहेत. ती सद्गुणाचरणाची रम्य विलोभने मुळीच नाहीत
 महाभारतात अशा अनेक कथा आहेत. खुद्द व्यासांचा जन्म, द्रोण, कश्यप इत्यादी व्यक्तींचे जन्म, अभिमन्यूचा मृत्यू, पांडवांची विजयानंतरची स्थिती, कुंती-रुक्मिणी या स्त्रियांची अंतकाळची स्थिती या घटना इतिहास म्हणूनच स्वीकारल्या पाहिजेत. भारतीय लेखक मोठे निर्भय पुरुष होते. काही तरी गुलाबी कथा सांगून लोकांची दिशाभूल करावी असा त्यांचा मुळीच हेतू नव्हता. कठोर सत्यानेच समाजाची प्रगती होत असते, सत्य इतिहास हीच समाजाची ठेव आहे, हे ते जाणून होते. त्या काळच्या लोकस्थितीला अनुसरून स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादेप्रमाणे त्यांनी काही काल्पनिक कथाही आपल्या ग्रंथात गोवल्या असल्या तरी त्यामुळे सर्वच कथा तशा आहेत असे म्हणणे सर्वथैव प्रमाणशून्य आहे. मूळ कथा शुद्ध स्वरूपात पाहिली तर तो इतिहास आहे याविषयी लेखकाच्या मनात बिलकुल संदेह नव्हता असे दिसते व म्हणूनच तो आपल्या मनात राहू देणे हे योग्य नाही.