पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 अशा या इतिहासग्रंथातले जे तत्त्वज्ञान पुढे सांगावयाचे आहे त्याचा प्रणेता म्हणजे प्रख्यात भारती पुरुष श्रीकृष्ण हा होय. महाभारताला कार्ष्ण (श्रीकृष्णाचा) वेद म्हणतात ते अगदी यथार्थ आहे. श्रीकृष्णाइतका प्रगल्भ बुद्धीचा, कर्तृत्वशाली, प्रज्ञावंत, व्यवहारकुशल, ज्ञानी व पराक्रमी पुरुष अजूनही साऱ्या त्रिभुवनात झाला नाही असे म्हटले तर, ज्याने महाभारत स्वतः वाचले आहे अशा माणसाला, मुळीच अतिशयोक्ती वाटणार नाही. हा जसा तत्त्ववेत्ता होता तसाच कर्ताही होता, ध्येयवादी होता तसाच व्यवहाराच्या व ध्येयाच्या मर्यादा जाणण्यात चतुर होता, सत्यनिष्ठेचा तो जसा उपदेश करी तसाच कुटिल राजनीतीचाही करी, आणि तो संसारप्रिय होता तसाच संयमी योगेश्वरही होता. सारांश, प्राचीन भारती संस्कृती म्हणजेच श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजेच प्राचीन भारती संस्कृती असे अनन्वयाने बोलणे सर्वथैव युक्त आहे.
 भारतीय तत्त्वज्ञान म्हणून जे विवेचन आता पुढे यावयाचे आहे त्यात महाभारतातील धर्मकारण, समाजकारण, व्यवहारनीती व प्रवृत्तिधर्म या विषयांवरील अनेक पुरुषांचे विचार संकलित करून दिलेले आहेत. श्रीकृष्णाचे विचार तर यात आहेतच पण त्याशिवाय भीष्म, नारद, पराशर, मार्कंडेय, धर्म, अर्जुन, भीम, कुंती, द्रौपदी, विदुला, इत्यादी अनेक थोर व्यक्तींनी वरील विषयांवर सांगितलेले विचार दिलेले आहेत. आणि हे आग्रहाने प्रतिपादन करण्यामध्ये हेतू असा आहे की, समाजाच्या धारणेला व उत्कृर्षाला अत्यंत पोषक असेच हे तत्त्वज्ञान आहे, हे सध्याचा हिंदुसमाजाच्या निदर्शनास आणावे. माझे तर स्पष्ट असे मत झाले आहे की, हे भारतीय तत्त्वज्ञान या भारती समाजाने दृष्टी