पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

आक्षेप घेईल असे वाटत नाही. पहिली दोन कारणे आहेतच. पण विशेषतः या तिसऱ्या कारणामुळे हे तत्त्वज्ञान म्हणजे 'भारतीय तत्त्वज्ञान' होय असे आग्रहाने म्हटले आहे.
 हे श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान अत्यंत तर्कशुद्ध, अनुभवसिद्ध व राष्ट्रहितांला अत्यंत पोषक असे असल्यामुळे हिंदुमात्राने याचे अहोरात्र मनन व चिंतन करून त्यातील सारार्थ ध्यानात घ्यावा यातच या समाजाचे कल्याण आहे.

धर्मकारण

 पांडव वनवासास गेल्यावर त्यांची स्थिती मोठी विकल झाली. इंद्रासारखे हे पराक्रमी योद्धे सर्व राजैश्वर्य सोडून वल्कले, नेसून, कंदमुळे खाऊ लागले आणि झाडाखाली पालापाचोळ्यावर पडू लागले. ते पाहून द्रौपदींचे मन अगदी दुभंगून गेले आणि धर्मा- धर्मासंबंधी फारच मोठ्या शंका तिच्या मनात निर्माण होऊ लागल्या. सत्यनिष्ट, पुण्यशील, सदाचरणी अशा धर्मराजाला अरण्यवास आणि कपटी, अधम अशा दुर्योधनाला राज्यलक्ष्मी या घटनेत काही तरी अधर्म असला पाहिजे असे तिला वाटू लागले. आणि दुर्योधनाने जर अन्यायाने राज्याचे अपहरण केले आहे तर आपली प्रतिज्ञा मोडूनही, सत्यनिष्ठा सोडूनही, आपण आपले राज्य परत घ्यावे, वनात राहू नये असे ती धर्मराजाला सांगू लागली. भीम, अर्जून यांनीही युधिष्ठिराच्या धर्मवेडाचा उपहास करून द्रौपदीच्या म्हणण्यास पाठिंबा दिला आणि अन्यायाने हिरावून नेलेली राज्यलक्ष्मी बाहुबलाने परत जिंकून घेणे हाच खरा क्षत्रियाचा धर्म आहे, वनात राहाणे हा भेकडपणा आहे असे त्यास सांगितले.