पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
१३
 

 पण धर्मराजाला हे मुळीच मानवले नाही. त्याने आपली पत्नी व बंधू यांस स्पष्टपणे सांगितले, 'मी माझी प्रतिज्ञा कधीच मोडणार नाही हे पक्के समजा. मोक्षाचा अथवा प्रत्यक्ष जीविताचाही त्याग करावा लागला तरीही मी सत्यरूप धर्माचा स्वीकार करणार. कारण राज्य, पुत्र, कीर्ती, द्रव्य यांना सत्याच्या एका षोडशांशाची सुद्धा सर यावयाची नाही.' (वन अ. ३४)
 धर्माच्या या भाषणावर त्या भावाभावांत खूप चर्चा, नव्हे खडाजंगी झाली. त्यांच्यापुढे खरोखरच मोठा बिकट व गहन प्रश्न येऊन पडला होता. धर्माची, सत्याची प्रतिज्ञापालनाची किंमत तरी किती ? राज्य गेले, कीर्ती गेली, जीव गेला आणि मोक्षही गेला तरी सत्याचरण करावयाचे की काय ? आणि करावयाचे असेल तर ते कशासाठी? सत्य हेच साध्य आहे, धर्म हेच साध्य आहे, का धर्म या साधनांनी आणखी काही साध्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे ?
 असले प्रश्न पांडवांना व द्रौपदीला फार त्रास देऊ लागले. या प्रश्नांनी त्यांनाच फक्त त्रास दिला असे नाही. अरण्यात पांडवांना बलराम भेटावयास आला तेव्हा त्यांची ती हीन स्थिती पाहून त्याचेही मन व्याकुळ झाले. तो श्रीकृष्णाला म्हणाला, "कृष्णा, धर्माचरण करणे हे प्राण्याच्या अभ्युदयाचे अथवा अधर्माचरण हे अपकर्षाचे कारण नाही असे म्हणावे लागते. कारण या धर्माचा आश्रय केला असताही महात्म्या युधिष्ठिरांस जटाधारी बनून आणि बल्कले नेसून वनात राहून क्लेश भोगावे लागत आहेत आणि दुर्योधन हा पृथ्वीचे राज्य करीत आहे तरी तो अधर्माने वागत आहे म्हणून काही पृथ्वी दुभंगून जाऊन त्याला गडप करीत नाही यामुळे ज्या मनुष्याची बुद्धी मंद आहे त्याला धर्मापेक्षा