पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

अधर्माचेच आचरण करणे अत्यंत श्रेष्ठ होय असे वाटू लागेल हे साहजिक आहे. दुर्योधन सुख भोगत आहे व धर्म दुःख भोगत आहे यामुळे लोकांनी धर्म व अधर्म यांपैकी कोणाचे आचरण करावे अशी मनुष्यांना शंका उत्पन्न झाली आहे." (वन. अ. ११९)
 बलरामांच्या या भाषणावरून धर्माला काहीतरी ध्येय असले पाहिजे, त्याच्या आचरणाने अभ्युदय झाला पाहिजे, तरच त्या आचरणाला काही अर्थ आहे असे त्यास वाटत होते असे दिसते. एखाद्या वेळेस विपरीत दिसताच धर्म सोडून देणे हे मंदबुद्धीचे लक्षण आहे हे म्हणणे योग्य आहे. पण जर अभ्युदय नाही तर धर्माचरण कशाला करावे अशी शंका येणे साहजिक आहे असे तो ज्याअर्थी म्हणतो त्याअर्थी अभ्युदय हे धर्माचे प्राप्तव्य असले पाहिजे असा त्याचा अभिप्राय आहे असे दिसते.
 महाभारतात धर्माधर्मनिर्णयाचे असे अनेक प्रसंग निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रसंगी श्रीकृष्ण, भीष्म, पराशर, व्यास, धर्म, भीम, अर्जुन इत्यादी विचारवंतांनी आपले विचार प्रगट केले आहेत. त्यावरून धर्मासंबंधी, त्याच्या स्वरूपासंबंधी, शाश्वततेसंबंधी आपल्याला महाभारताचे मत काय आहे याचा निर्णय करणे सहज शक्य होते. तो प्रयत्न आता करावयाचा आहे.

धर्म हे समाजोन्नतीचे साधन

 भारती तत्त्ववेत्त्यांचा पहिला सिद्धांत असा आहे की धर्म हे साध्य नसून साधन आहे. आणि समाजाची उन्नती हे त्याचे साध्य आहे. आणि ज्यामुळे समाजाची उन्नती होईल तोच धर्म होय अशी त्यांनी धर्माची व्याख्या केली आहे. युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्मांनी पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे.